Rana's guerrilla fight, Deshmukh with proofs | राणांचा गनिमी कावा, पुराव्यांसह देशमुखांकडे
राणांचा गनिमी कावा, पुराव्यांसह देशमुखांकडे

ठळक मुद्देतुषार भारतीय टिनपाट : माझ्या घरापुढे ‘बेशरम’ लावून दाखवाच

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय यांचे आव्हान स्वीकारून आ. रवि राणा पुरावे घेऊन पोहोचले, मात्र थेट आ. सुनील देशमुखांकडे. तुषार भारतीय हे नगरसेवक आहेत. मी आमदार आहे. त्यामुळे माझ्या तोडीचा, वकुबाएवढा माणूस द्या, मी पुरावे देतो, असे राणा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. तिकडे तुषार भारतीय पत्रपरिषदेत राणा पळपुटे असल्याचा आरोप करीत असताना, इकडे आ. राणा आ. देशमुखांना पुरावे सादर करीत होते.
कल्याणनगर ते यशोदानगर येथील रस्ता आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. त्याचे काम सुरू झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली. नगरसेवक तुषार भारतीय यांनी या रस्त्याचे श्रेय पालकमंत्र्यांना देत, राणांनी लुडबूड करू नये, असे बजावले होते. आ. राणा हे खोटारडे व पळपुटे आहेत. त्यांनी या रस्त्याच्या कामाबाबत आधी पुरावे द्यावे आणि नंतर श्रेय घ्यावे, असा शब्दबाण तुषार भारतीय यांनी मारला होता.

निवडणूक कोण लढणार? शिवराय की भारतीय?
धमक असेल, तर त्यांनी माझ्या घरासमोर रोपटे लावून दाखवावे. मी २ वाजता वाट बघतो. निवडणुकीची हवा तयार करण्यासाठी पत्रपरिषदेतून खोटे बोलले जात आहे. नेमके निवडणूक कोण लढणार, शिवराय की भारतीय, हे आधी ठरवा. एका नगरसेवकाला आमदाराने पुरावे सादर करावे काय? पालकमंत्री आले असते, तर जबाब देऊ शकलो असतो. पालकमंत्र्यांचाच आता भारतीय यांच्यावर विश्वास राहिला नाही. आ. सुनील देशमुख हे यापूर्वी पालकमंत्री राहिले आहेत. मला मिळालेला निधी हा राज्य शासनाचा आहे, महापालिकेचा नव्हे. त्यांचा या विषयावर अभ्यास आहे. विधानसभेतील ज्येष्ठ सहकारी म्हणून २०१६ पासून रस्त्याकरीता केलेल्या पाठपुराव्याचे पत्र आ. सुनील देशमुख यांना दाखविले. तुषार भारतीय यांना स्वत:चा प्रभाग संभाळता येत नाही. अशा टिनपाट नगरसेवकाने ही भाषा बोलू नये, असे आ. रवि राणा म्हणाले.

आ. राणा माझ्याकडे आले. त्यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा केल्याचे पत्र दाखविले. कुणाला निधी दिला, यासंदर्भाच्या दोघांच्या भूमिका मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत. त्यामुळे तेच निर्णय देतील. हा विषय येथेच संपवावा, अशी विनंती मी दोघांना करेन.
- सुनील देशमुख, आमदार


Web Title: Rana's guerrilla fight, Deshmukh with proofs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.