‘पेल्या’तले वादळ शमले; नरवणे कॉन्फिडंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:59 PM2018-07-21T22:59:18+5:302018-07-21T22:59:38+5:30

दोन महिन्यांपासून घोंगावत असलेले महापौरपदाचे वादळ अखेर शमले. प्रदेशाध्यक्षांना निवेदन देऊनही पदरी काहीही न पडल्याने ‘बंडोबा’ थंडगार झाले आहेत. पेल्यातले हे वादळ शमल्याने महापौर संजय नरवणे चांगलेच कॉन्फिडंट झाले आहेत. त्यांच्यातील या बदलाची प्रचिती गुरुवारच्या आमसभेतही दिसून आली.

Pyaalya storm hits; Molding Confident! | ‘पेल्या’तले वादळ शमले; नरवणे कॉन्फिडंट!

‘पेल्या’तले वादळ शमले; नरवणे कॉन्फिडंट!

Next
ठळक मुद्देमहापौर बदलाचा विषय : उपमहापौर, सभागृह नेताही कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन महिन्यांपासून घोंगावत असलेले महापौरपदाचे वादळ अखेर शमले. प्रदेशाध्यक्षांना निवेदन देऊनही पदरी काहीही न पडल्याने ‘बंडोबा’ थंडगार झाले आहेत. पेल्यातले हे वादळ शमल्याने महापौर संजय नरवणे चांगलेच कॉन्फिडंट झाले आहेत. त्यांच्यातील या बदलाची प्रचिती गुरुवारच्या आमसभेतही दिसून आली.
गतवर्षी ठरविल्याप्रमाणे भाजपने महापौरांसह उपमहापौर व सभागृहनेता बदलवावा, अशी मागणी अनेकांनी केली. यात महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांचा अधिक पुढाकार होता. ९ जूनला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मागणी बंडाळीत बदलली आणि सूर तीव्र होऊ लागला. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या भावनेतून महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यात आली. उघड विरोधही करण्यात आला. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरूद मिरविणाऱ्या भाजपने सव्वा वर्षांच्या शब्दाला जागावे, अशी सांघिक प्रतिक्रिया उमटली. शहराध्यक्ष ते राज्याध्यक्षांपर्यंत मागणी रेटून धरण्यात आली. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही महापौरांचा चेहरा न बदलल्याने आता विरोधाची धार बोथट होऊन, तलवार म्यान करण्यात आली आहे.
महापौर व अन्य पदांसाठी इच्छुक असलेल्यांपैकी बोटावरचे नगरसेवक भाजपचे आहेत. उर्वरित अनेक जणांनी वेळेवर प्रवेश करत भाजपची उमेदवारी पटकावली. त्याचवेळी पाच वर्षे पदे मागायची नाही, असा शब्द त्यांच्याकडून भाजपने घेतल्याचे बोलले जाते. ही काँग्रेस नव्हे, तर भाजप आहे आणि भाजपमध्ये अशी मागून पदे मिळत नसतात, असा साक्षात्कारही अनेक इच्छुकांना झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सव्वा वर्षाचा कालावधी उलटण्यासाठी दोन महिने होऊन जात असताना नरवणे बदलले नाहीत; आता बदलही होणार नाही. त्यामुळेच की काय इच्छुकांनी तलवार म्यान केली. दुसरीकडे नरवणेंना पूर्ण अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याने ते कॉन्फिडंट वाटत आहेत. पहिल्या रांगेतून आलेली चिठ्ठी वाचून न दाखविता गुरुवारच्या आमसभेत नरवणेंनी स्वत:च पीठासीन सभापती म्हणून ‘रुलिंग’ दिले. त्यानंतर नरवणे अन्य जणांच्या सावलीतून बाहेर पडत असल्याची प्रतिक्रिया उमटली.
बंडाळी शमली, इच्छा कायम
भाजपचे वरिष्ठ नेते महापौर बदलाला राजी आहेत. मात्र, स्थानिक नेते त्याविरोधात असल्याची भावना इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळेच की काय, भाजपने घेतलेल्या प्रभागनिहाय कंत्राटाचा पुरस्कार न करता झोननिहायची री ओढायची, यासाठी पक्षातील इच्छुकांनी विरोधकांची कुमक मागविली. मात्र, विरोधी पक्षालाही प्रभागनिहाय पद्धती हवी असल्याने भाजपक्षातील विरोध शून्य झाला.

Web Title: Pyaalya storm hits; Molding Confident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.