नगरविकास मंत्रालयात अडकली स्वच्छ प्रभागांची पारितोषिके 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 06:29 PM2018-06-24T18:29:23+5:302018-06-24T18:30:17+5:30

स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- महापालिकांचीही गोची झाली आहे.

Prizes of clean wings stuck in urban development ministry | नगरविकास मंत्रालयात अडकली स्वच्छ प्रभागांची पारितोषिके 

नगरविकास मंत्रालयात अडकली स्वच्छ प्रभागांची पारितोषिके 

Next

 अमरावती -  स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- महापालिकांचीही गोची झाली आहे. शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे या स्पर्धेतील विजेत्या प्रभागांची नावे, पारितोषिक रक्कम व ती पारितोषिके कुठून द्यायची, असा साराच मामला प्रलंबित आहे. 

स्वच्छ महाराष्टÑ अभियानामध्ये सहभागी होण्यास लोकांना उद्युक्त कारणे, हगणदारीमुक्त व स्वच्छतेबाबत शहरांचे कायमस्वरूपी क्षमता वाढविणे, स्वच्छ महाराष्ट्राच्या दिशेने जो प्रवास चालला आहे - त्यामध्ये समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करणे, यासाठी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. याच काळात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ची अंमलबजावणी सुरू असल्याने या स्पर्धेलाही व्यापक प्रतिसाद मिळाला. मार्च महिन्यात प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील या स्पर्धेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी व २० मार्च २०१८ पर्यंत गुणानुक्रमानुसार पहिली तीन बक्षिसे देण्यात यावी, असे निर्देश नगरविकासने दिले होते. या स्पर्धेची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करून घेण्यात आल्यावर त्याबाबतचा अहवाल २५ मार्चपर्यंत राज्य शासनास पाठवावा; तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर या बक्षीस योजनेसाठी कोणाला निधीमधून खर्च करावा, याबाबतचे आदेश शासन देईल, असे मंत्रालयातील उपसचिव सुधाकर बोबडे यांनी म्हटले होते. त्यानुसार बहुतांश सर्व महापालिका, नगरपालिकांनी त्याबाबतचे अहवाल नगरविकास मंत्रालयाकडे पाठविले. मात्र, एप्रिल आणि त्यापाठोपाठ जून संपत असताना या बक्षीस योजनेसाठी कोणत्या निधीमधून खर्च करावा, याबाबतचे स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने दिलेले नाहीत. महापालिका प्रशासनाने याबाबत बोबडे यांच्याही संपर्कही साधला. मात्र, २४ जूनपर्यंत तरी निकाल आणि पारितोषिकाबाबत नगरविकास विभागाने कोणतेही आदेश पारित केले नाहीत.

पालिका स्तरावर सामसूम 
अमरावती महापालिका क्षेत्रात कोणत्या प्रभागात प्रभावीपणे स्वच्छ वॉर्ड स्पर्धा राबविण्यात आली, पहिले तीन स्वच्छ प्रभाग कोणते, याबाबतचा अहवाल त्रयस्थ संस्थेने महापालिकेला दिला आहे. मात्र, ती रक्कम कोणत्या निधीतून खर्च करायची, याबाबतचे निर्देश नसल्याने पालिकेने निकाल गुलदस्त्यात ठेवले आहेत. 

असे आहेत पारितोषिके
अ व ब वर्ग महापालिकांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३५ लाख व तृतीयसाठी २० लाख, तर क व ड महापालिकांतील पहिल्या तीन स्वच्छ प्रभागांना अनुक्रमे ३०, २० व १५ लाख रुपये बक्षिसे देण्यात येतील. अ वर्ग नगरपालिकांमधील स्वच्छ प्रभागांना अनुक्रमे ३०, २० व १५ लाख, ब वर्ग नगर परिषदांना २०, १५ व १० लाख, तर क वर्ग नगर परिषदांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ प्रभागाला अनुक्रमे १५ लाख, १० लाख व ५ लाख मिळतील.

Web Title: Prizes of clean wings stuck in urban development ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.