For the post of University Examination Controller | विद्यापीठ परीक्षा नियंत्रक पदासाठी मोर्चेबांधणी

ठळक मुद्देजुलैमध्ये होणार नव्याने निवड : सामान्य प्रशासन विभागाकडे १८ अर्ज

आॅनलाईन लोकमत
अमरावती : महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्यान्वये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालकपदासाठी प्रशासनाने नव्याने अर्ज मागविले आहेत. १८ जणांनी अर्ज सादर केले असून, हे पद काबीज करण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाचे संचालक जयंत वडते हे जुलै २०१८ मध्ये पदमुक्त होणार आहे. तसेही वडते यांची मूळ नियुक्ती ही तिवसा येथील यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून आहे. ते विद्यापीठात परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक पदासाठी अर्ज मागविण्यास प्रारंभ केला असून, ५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख होती. त्यानुसार १८ जणांचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झाले आहे.
नव्या विद्यापीठ कायद्यानुसार मान्यताप्राप्त नवोउपक्रम नवसंशोधन व सहचार्य संचालकपदासाठीसुद्धा १० अर्ज मिळाल्याची माहिती आहे. मात्र, परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालकपदी विराजमान होण्यासाठी विशेष लॉबी सक्रिय झाली आहे. विद्यापीठात कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव त्यानंतर परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक हेच पद महत्त्वाचे मानले जात असल्याने काही ईच्छुकांनी आतापासूनच त्यासाठी राजकीय वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अर्ज सादर करण्याचा अवधी संपला असून आलेल्या अर्जाची छाननी, वैध, अवैध ठरविण्यासाठी स्वतंत्र तारीख निश्चित केली जाणार आहे.
साधारणत: सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी या अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची नावे स्पष्ट केली जातील. त्यानंतर तारीख निश्चित करून परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक पदासाठीची निवड प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.