चिमुकल्याच्या पाठीवर पाइपचे वळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 09:11 PM2019-05-25T21:11:47+5:302019-05-25T21:12:50+5:30

मामाचा प्रताप : चाइल्ड लाइनला अपर पोलीस अधीक्षकांकडून मिळाली माहिती

Pipe's turn on the back of the pinch in amravati | चिमुकल्याच्या पाठीवर पाइपचे वळ

चिमुकल्याच्या पाठीवर पाइपचे वळ

Next

अमरावती : आई-वडील तीन वर्षांपूर्वी दगावल्यानंतर आश्रयाला असलेल्या मुलाच्या पाठीवर मामाने लोखंडी पाइपचे वळ काढले. पोलिसाच्या घरातील या अत्याचाराला खुद्द अपर पोलीस आयुक्त श्याम घुगे यांनी वाचा फोडली. त्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांच्या मदतीने चाइल्ड लाइनने मुलाचा ताबा मिळविला. 

सदर १४ वर्षीय मुलगा गुरुकुंजात शिक्षणासाठी दाखल करण्यात आला आहे. तो महिनाभरापूर्वी अमरावतीत एका नातेवाईक महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी राहायला आला. या पीएसआयची अकोला येथे ड्युटी आहे.  त्यामुळे या घरात त्या मुलाची आजी आणि दोन मामा राहतात. या मुलाला २४ मे रोजी १२.३० च्या सुमारास धामणगावातील मामाने लोखंडी पाइपने मारहाण केल्याची माहिती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाइनला अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्यामार्फत प्राप्त झाली. त्यांच्या सूचनेवरून चाइल्ड लाइनची चमू घटनास्थळी पोहोचली तेव्हा मुलाची आजी व मामा घरात होते. बराच वेळानंतर त्यांनी दार उघडले. मुलगा एसपी ऑफिससमोर लिंबू-सरबतच्या गाडीवर गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, अर्धा तासाने तो मुलगा घाबरलेल्या स्थितीत बाथरूममधून डोकावत होता. तो केव्हा आला, याबाबत मामा उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून गेला; मात्र आजी ढवळाढवळ करीत होती. त्यामुळे चाइल्ड लाइनने मुलाला बाहेर बोलावले. त्याने पाइपचे वळ दाखवले. यावेळी आजी त्याला परत घरात घेऊन गेली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चाइल्ड लाइनने दोन सदस्य घरापुढे ठेवून फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. समन्वयक फाल्गुन पालकर यांनी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमेलेंना माहिती दिली. त्यांनी पोलीस व्हॅन पाठवून मुलाला आणले तसेच मामाची चौकशी केली.  

चाइल्ड लाइनशी संपर्क साधा
अशाप्रकारचे कोणतेही लहान मुला-मुलींच्या छळाच्या घटना कुठेही दिसल्यास, तर चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क करावा, असे आवाहन संचालक सूर्यकांत पाटील, सहायक संचालक प्रशांत घुलक्षे, केंद्र समन्वयक फाल्गुन पालकर, अजय देशमुख, शंकर वाघमारे, अमित कपूर यांनी केले आहे. 

सदर मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बाल कल्याण समितीच्या परवानगीने त्याला शासकीय बालगृहात पाठविण्यात येईल. मुलाचे समुपदेश केले जाईल - फाल्गुन पालकर, केंद्र समन्वयक 

चाइल्ड लाइनकडून माहिती मिळाली. प्राथमिक चौकशी करा, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणात मुलाची वैद्यकीय तपासणी करू. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल - आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

Web Title: Pipe's turn on the back of the pinch in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.