‘एसएमएस’च नाही, अपात्र कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:45 PM2018-06-22T22:45:35+5:302018-06-22T22:45:58+5:30

Not just SMS, how ineligible? | ‘एसएमएस’च नाही, अपात्र कसे ?

‘एसएमएस’च नाही, अपात्र कसे ?

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : यंत्रणेची टाळाटाळ, टोकनधारकांचा काय दोष ?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविण्यात आलेले नाही. अनेकदा फोनद्वारेच सांगण्यात आले असल्याने यातही हेराफेरी झाली. शेतकरी अपात्र कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
शेतकऱ्यांना अनुदान देण्याविषयी सहकार विभागाने बुधवारी काढलेल्या पत्रकातील अटी-शर्तीनुसार तूर व हरभरा विक्रीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली व प्रत्यक्षात केंद्रावर खरेदी झाली नाही, त्या शेतकऱ्यांना १० क्विंटल प्रतिहेक्टर व दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजारांची मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांना विहिद मुदतीत एसएमएस पाठविण्यात आला व पूर्वी एक वेळा तूर केंद्रांवर विकली आहे तसेच एसएमएस पाठविल्यानंतरही तूर विक्रिसाठी आणली नाही, ते शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरविण्याचे निर्देश आहेत. पोर्टलवर नोंदणी केलेल्या व तूर खरेदीसाठी एसएमएस न आलेल्या शेतकरी अनुदानासाठी पात्र, पोर्टलवर लागवडीखालील क्षेत्राच्या माहितीची नोंद चुकीची झाली, अशा प्रकरणी क्षेत्राची खातरजमा करून अनुदान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यंदा तुरीसाठी ३६ हजार ६९९ व हरभऱ्यांसाठी २३ हजार ७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी अभावी घरीच पडून आहे. १५ मेपासून तूर तर १३ जूनपासून हरभऱ्यांची शासकीय खरेदी बंद करण्यात आली. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. त्यामुळे या शेतकºयांना आता प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. मात्र, अटी व शर्तींचे जाचक निकष व खरेदीदार यंत्रणेच्या घोळात अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
खरेदीदार यंत्रणेचा भोंगळ कारभारच दोषी
जिल्ह्यातील नऊ केंद्रावर ‘डीएमओ’, तर तीन केंद्रावर ‘व्हीसीएमएफ’द्वारा तूर व हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. संबंधित तालुक्यातील खरेदी-विक्री संघांद्वारा ही प्रक्रिया हाताळण्यात आली. अनेक केंद्रांच्या ठिकाणी ‘एसएमएस’ची सुविधा नाही. ज्या ठिकाणी आहे, तेथे तांत्रिक दोषामुळे शेतकºयांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ आले नसल्यामुळेच त्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही. यामध्ये शेतकरी अपात्र कसा, अशी विचारणा केली जात आहे.
खरेदी-विक्री संघातच झाला घोळ
तूर, हरभरा खरेदीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ किंवा फोन करण्याची जबाबदारी संबंधित खरेदी-विक्री संघाकडे होती. नेमका याच ठिकाणी घोळ झाला आहे. रजिस्टरवर कोऱ्या जागा सोडणे, ज्याचा क्रमांक आहे - त्याच्याऐवजी निकटस्थांना लाभ देणे आदी प्रकार झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये अमरावती खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक व कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. या सर्व प्रकारात शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Not just SMS, how ineligible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.