गाडगेबाबांच्या शेंडगावकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:04 PM2017-12-19T23:04:56+5:302017-12-19T23:06:11+5:30

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिलेल्या संत गाडगेबाबांच्या पुतळ्याचे अनावरण दीड वर्षांपूर्वी शेंडगाव येथील भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शासकीय जागेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

Neglected Chief Minister of Gadgebaba, Shendgaon | गाडगेबाबांच्या शेंडगावकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्षच

गाडगेबाबांच्या शेंडगावकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्षच

Next
ठळक मुद्देविकास रखडला : पुतळा अस्वच्छ, परिसरात वाढले गाजरगवत

संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिलेल्या संत गाडगेबाबांच्या पुतळ्याचे अनावरण दीड वर्षांपूर्वी शेंडगाव येथील भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शासकीय जागेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावेळी शेंडगाव विकासासाठी २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतरचा आराखडाही शासनदरबारी धूळखात आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनदरबारी पाठविण्यात आला होता. मुख्य सचिवांनी आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी आराखड्याचे प्रेझेंटेशन दिले. आराखड्याचा अंतिम चेंडू मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी याला मान्यता दिल्यास शेंडगाव विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुतळा परिसरात घाणीचे साम्राज्य
सद्यस्थितीत शेंडगाव येथील १८ एकरांची शासकीय जागेत विकास होणार आहे. मात्र, बुधवार २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असतानाही येथील पुतळा परिसरात गाजरगवत वाढले आहे. शासनाने ती जागा खासपूर ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली आहे. तेथे स्मृतिभवन बांधणे, नजीकच भुलेश्वरी नदी असल्याने १८ एकरांच्या जागेत कंपाऊंड वॉल तयार करणे, दोन प्रवेशव्दार करणे, भक्तनिवास बांधणे व गाडगेबाबांच्या दुर्मीळ वस्तुंची म्युझियम बांधणे अशा १८ कोटींचा विकास आराखडा विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत तयार केला. परंतु दीड वर्षांपासून संत गाडगेबाबांची जन्मभूमि शेंडगाव विकासापासून उपेक्षितच आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. परिसर स्वच्छ ठेवणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. पण, पुण्यतिथी असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. ज्या ठिकाणी गाडगेबाबांचा पुतळा बसविण्यात आला तेथील परिसराची गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबा कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शरद साबळे यांनी कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता केली. याठिकाणी संत गाडगेबाबा जन्मभूमी स्मारक समितीसुद्धा आहे. परंतु, या समितीचेही याकडे दुुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जन्मभूमिचा विकास कसा होईल, असा प्रश्न राज्यभरातील भाविकांना पडला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सदर प्रस्तावाला मंजुरी देऊन निधी द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अमरावती येथील समाधी मंदिराचाही विकास रखडला आहे. तत्कालीन शासनाने स्मृतिभवनाच्या इमारतीसाठी एक कोटी ६४ लाख रुपये दिले होते. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी बाबांच्या समाधी मंदिराच्या विकास आरखड्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरवाडी येथील विकास आराखडाही शासनाकडे पाठविला आहे.
समाधी मंदिराचा विकास रखडला
अमरावती येथील समाधी मंदिरापुढील जागेत गाडगेबाबांचे स्मृतिभवन, बगीचा, धर्मशाळा व इतर विकासकामांसाठी शासनाकडे १८ कोटींचा विकास आराखडा दिला. त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. यापूर्वीच्या सरकारने १ कोटी ६४ लक्ष रुपये निधी दिला. आराखड्याची फाइल मंत्रालयात धूळखात पडल्याचे समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी सांगितले.

आराखड्याला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात या निधीची तरतूद होणार आहे.
- रमेश बुंदिले
आमदार, दर्यापूर

मी ग्रामपंचायतीचा आताच चार्ज घेतला आहे. यासंदर्भात सरपंचाशी चर्चा करून सांगतो. या ठिकाणची स्वच्छता करण्यात येणार आहे.
- एस.आर. गोवारे,
ग्रामसेवक, खासपूर

Web Title: Neglected Chief Minister of Gadgebaba, Shendgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.