दगडाने ठेचून पित्यानेच केली मुलीची हत्या

By admin | Published: February 16, 2016 12:06 AM2016-02-16T00:06:25+5:302016-02-16T00:06:25+5:30

‘जा मुली जा..दिल्या घरी तू सुखी रहा..’ डोळ्यांत दाटलेले अश्रू कसेबसे थांबवित पाठवणीच्या वेळी लाडक्या लेकीला निरोप देणारा ‘पिता’ आपण नेहमी बघतोे.

The murdered daughter committed by a stone crushed by a stone | दगडाने ठेचून पित्यानेच केली मुलीची हत्या

दगडाने ठेचून पित्यानेच केली मुलीची हत्या

Next

प्रेमदिनीचे क्रौर्य : आंतरधर्मीय विवाहाला विरोध
तिवसा : ‘जा मुली जा..दिल्या घरी तू सुखी रहा..’ डोळ्यांत दाटलेले अश्रू कसेबसे थांबवित पाठवणीच्या वेळी लाडक्या लेकीला निरोप देणारा ‘पिता’ आपण नेहमी बघतोे. परंतु मुलीच्या आंतरधर्मीय विवाहामुळे संतप्त झालेल्या बापाने पोटच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आणि अवघा समाज सुन्न झाला. ही घटना तिवसा तालुक्यातील सार्सी येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला घडली. एकीकडे सगळीकडे ‘प्रेमदिन’ साजरा होत असताना घडलेला हा ‘आॅनर किलिंग’चा प्रकार अंगाचा थरकाप उडविणारा आहे.
संजय भाले (४८, रा. सार्सी) असे क्रूरकर्मा आरोेपी पित्याचे नाव आहे तर अंजली संजय भाले असे मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे. माहुली पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा बळी घेणाऱ्या पित्याला अटक करून त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा नोंदविला आहे. विस्तृत माहितीनुसार, २० वर्षीय अंजलीचे एका आंतरधर्मीय तरूणावर प्रेम होते. १५ दिवसांपूर्वीच दोघांनी पळून जाऊन विवाह केला होेता. यामुळे अंजलीचे वडील संजयच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाचा राग त्याच्या मनात धुमसत होता. सामाजिक बदनामी आणि प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मुलीला धडा शिकविण्याचा कट त्याच्या मनात शिजत होता.
मुलीचा शोध सुरू असतानाच त्याला दोघेही तळेगाव श्यामजीपंत येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. संजयने नियोजनबध्द पध्दतीने एम.एच.३१ सी.पी. ५६६८ ही गाडी भाड्याने घेऊन चालक इरफान खान छोटे खान (२६) याला सोबत घेतले आणि १४ फेब्रुवारीला तळेगाव श्यामजीपंत गाठले. जबरदस्तीने अंजलीला गाडीत बसविले आणि मारहाण करीत सार्सी येथे आणले. सार्सीला गाडी घरासमोर थांबताच त्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने अंजलीला गाडीतून बाहेर फेकले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने शेजारी पडलेला दगड उचलून तिच्या डोक्यावर आणि मानेवर असंख्य प्रहार केले. प्राणांतिक वेदनांनी तडफडणाऱ्या पोटच्या गोळ्याच्या किंकाळ्याही त्याच्यातील पितृत्त्व जागे करू शकल्या नाहीत. अंजलीचा श्वास थांबेपर्यंत संजय वार करीत होता. अंजली रक्ताच्या थारोळ्यात गलितगात्र होऊन पडली होती. ती मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर अगदी निर्विकारपणे संजयने घरात जाऊन आतून दार बंद करून घेतले.
गावकरी हा प्रकार बघत होते. सारेच अवाक होते. घडलेला प्रकार आकलनापलीकडचा होता.

पित्याला अटक
तिवसा : सारा गाव स्तब्ध झाला होता. गावकऱ्यांच्या मनात संताप धुमसत होता. तिवसा पोेलीस घटनास्थळी पोहोचताच गावकऱ्यांचा संताप उफाळून आला. संतप्त गावकऱ्यांनी पोेलिसांचे वाहन उलथवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस मित्रांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर रात्री अतिरिक्त पोलीस ताफा सार्सी गावात दाखल झाला होता.
पोलिसांनी आरोपी पिता संजय सहदेव भाले याला अटक करुन त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहायक पोलीस अधीक्षक मकरंद यांनी तिवसा पोेलीस ठाण्यात येऊन रविवारी सकाळी ४ वाजेपर्यंत कारवाई केली. या घटनेने सार्सी गावात शोककळा पसरली आहे. तिवसा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अंजलीचा मृतदेह जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. १५ फेब्रुवारी रोजी मृतदेह नातलगांच्या स्वाधिन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीस मित्रांची तत्परता
मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून ती प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने क्रूरपणे मुलीचा बळी घेतला. या घटनेमुळे सार्सी गाव हादरले. गावात पोलीस येताच गावकऱ्यांनी पोेलिसांचे वाहन उलथवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस मित्रांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित घटना टळली.

ममत्वापेक्षा प्रतिष्ठा ठरली वरचढ ?
मुलांच्या असंख्य चुका माफ करण्याची क्षमता पालकांमध्ये असते. मात्र, येथे संजयची प्रतिष्ठेची कथित व्याख्या ममत्वाच्या भावनेवर मात करणारी ठरली. सज्ञान मुलीच्या चुकी (?)ची शिक्षा तिची हत्या करून देण्याचा अधिकार या पित्याला कोेणी दिला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

Web Title: The murdered daughter committed by a stone crushed by a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.