‘आक्रमण’च्या सुनील गजभियेविरुद्ध खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:44 PM2018-03-17T22:44:17+5:302018-03-17T22:44:17+5:30

एक्स्प्रेस हायवेवरील एका विहिरीत आढळलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्ती शीतल पाटील हिचा असल्याचे शुक्रवारी उशिरा रात्री स्पष्ट झाले.

Murder crime against Sunil Gajbhiye of 'Invasion' | ‘आक्रमण’च्या सुनील गजभियेविरुद्ध खुनाचा गुन्हा

‘आक्रमण’च्या सुनील गजभियेविरुद्ध खुनाचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘तो’ मृतदेह शीतल पाटीलचा : रहमत खाँचाही सहभाग, अंतिम शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : एक्स्प्रेस हायवेवरील एका विहिरीत आढळलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्ती शीतल पाटील हिचा असल्याचे शुक्रवारी उशिरा रात्री स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवाल व नातेवाईकांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध हत्या व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा शनिवारी नोंदविला. आक्रमण संघटनेचे संघटक प्रमुख अ‍ॅड. सुनील शामराव गजभिये याच्यासह रहेमत खाँ पठाण यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
शुक्रवारी दुपारी एका ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह एक्स्प्रेस हायवेलगतच्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. विहिरीत आढळलेल्या चिठ्ठीत आईच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या अनुषंगाने गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, उशिरा रात्री नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली आणि त्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला.
शीतल ‘आक्रमण’ संघटनेची जिल्हाध्यक्ष
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल अरुण पाटील (डुकरे) (३२,रा.विलासनगर) ही तिच्या शामल नामक बहिणीच्या घरी आई व तिच्या आठ वर्षीय मुलीसोबत राहात होती. तिचा २०१२ मध्ये बुलडाणा येथे विवाह झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर ती विलासनगर येथे बहिणीकडे राहायला आली. तिच्या बहिणीचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. तिचा सावत्र भाऊ वैभव बन हा परतवाडा येथे राहतो. शीतलने वसुंधरा फाऊन्डेशन या एनजीओसोबत विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला. तसेच अ‍ॅड. सुनील गजभिये याचे सहायक म्हणून तिने कामकाज पाहिले. शीतलला सामाजिक कार्याची आवड असल्याने तिने गजभियेच्या आक्रमण संघटनेत जिल्हाध्यक्षपद हिरीरीने सांभाळले. अखेर त्याच गजभियेवर तिच्या हत्येचा आरोप आहे.

सुनील गजभिये तीन दिवसांपासून गायब
अ‍ॅड. सुनील गजभिये हे स्थानिक न्यायालयात वकिली व्यवसाय करीत असताना शीतल पाटील या त्यांना सहकार्य करीत होत्या. दोघेही मंगळवार सायंकाळनंतर कुणाच्याही दृष्टीस पडले नाहीत. इर्विन चौकातून त्यांचा थांगपत्ता लागला नाही. मंगळवारपासून गजभियेचा मोबाईल बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘आक्रमण’च्या मूळ उद्देशालाच हरताळ
आॅटोचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुनील गजभिये यांनी आक्रमण संघटनेची स्थापना केली. मात्र, त्यांच्या बहूतांश आंदोलनावर संशयकल्लोळ निर्माण झाला होता. या संघटनेच्या अन्य एका पदाधिकाऱ्याविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गजभियेच्या आंदोलनात शीतल पाटील हिने सक्रीय सहभाग नोंदविला. मात्र, शनिवारी शवागारासमोर या संघटनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित असताना गजभियेची अनुपस्थिती संशयाला पुरक ठरली.

शवविच्छेदनात इंटर्नल हेड इंज्यूरी असल्याचे प्रथमत: दिसून येत आहे. शवविच्छेदनाचा हा प्राथमिक अहवाल पोलिसांना देण्यात आला.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक

शीतल पाटील हिच्या मृत्यू प्रकरणात तिच्या भावाने तक्रार नोंदविली. त्यानुसार दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.
- मनीष ठाकरे,
ठाणेदार, गाडगेनगर ठाणे

Web Title: Murder crime against Sunil Gajbhiye of 'Invasion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.