मोदी सरकारने सीबीआयची विश्वासार्हता संपविली, सिन्हांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:36 PM2018-10-22T22:36:10+5:302018-10-22T22:37:12+5:30

राष्ट्र मंचतर्फे विविध मुद्द्यांवर आयोजित संवाद कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय हा देशाला नुकसानदायी ठरला

The Modi government ended the credibility of the CBI, the serious allegations of Sinha ended, | मोदी सरकारने सीबीआयची विश्वासार्हता संपविली, सिन्हांचा गंभीर आरोप

मोदी सरकारने सीबीआयची विश्वासार्हता संपविली, सिन्हांचा गंभीर आरोप

Next

अमरावती - केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) हे हल्ली केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे या यंत्रणेत अपहार, भ्रष्टाचार वाढीस लागला. वरिष्ठांमध्ये सुंदोपसंदी सुरू झाली. सीबीआयमध्ये नेमके काय चालले हेच कळत नसून, सरकारनेच या यंत्रणेची विश्वासार्हता संपविली, असा घणाघाती आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सोमवारी अमरावती येथे केला. 

राष्ट्र मंचतर्फे विविध मुद्द्यांवर आयोजित संवाद कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय हा देशाला नुकसानदायी ठरला. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि सामान्यांना झळ पोहचली. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना पंतप्रधानांनी अद्यापही काळेधन आणले नाही. मात्र, नोटबंदीदरम्यान त्यांनी काही मित्रांचा काळा पैसा पांढरा केला. नोटबंदीनंतर आयकर विभागाने 18 लाख प्रकरणे दाखल केली, अशी जुमलेबाजी मोदी करतात. परंतु, जुमलेबाजी, धोकेबाजीने सरकार चालत नाही. रूपयांची घसरण होत असताना आता मोदी का बोलत नाहीत, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. देशाच्या अग्रणी असलेली यंत्रणा सीबीआयला भ्रष्टाचाराने पोखरले. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला गेला. ‘गुड गर्व्हनन्स’ कुठे आहे. केंद्र सरकारची वाटचाल सुशासन नव्हे, तर दु:शासनकडे सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 
सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायमूर्ती उघडपणे पत्रपरिषद घेऊन लोकतंत्र असुरक्षित असल्याची व्यथा मांडतात, हे कशाचे भाकित आहे, याचा विचार आता सामान्य जनतेला करावा लागेल. सरकारच्या अफलातून कारभारात देशात नवीन आणीबाणी लागू झाली असून, ते सन २०१९ च्या निवडणुकीत उलथवून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. राफेल विमान खरेदीत काय असेल ते पंतप्रधानांनी देशवासीयांपुढे येऊन बोलले पाहिजे. चूक झाली असेल तर देशवासियांची माफी मागावी, असेही सिन्हा म्हणाले. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री तथा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, आपचे खासदार संजय सिंग, अचलपूरचे आमदार बच्चू कडू, काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख आदी उपस्थित होते.

ही तर मुख्यमंत्र्यांची धोकेबाजी
अकोला येथे गतवर्षी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या ऐकून न घेता त्या मान्य केल्या. परंतु, वर्षभरानंतर एकही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची कृती ही जुमलेबाजी नव्हे, तर धोकेबाजी आहे. दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा, यासाठी 23 ऑक्टोबर रोजी अकोल्यात पुन्हा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन केले जात असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिली. 

राजकारणात चांगल्या लोकांनी यावे
राजकारण हा गुंडांचा अड्डा, असे म्हटले जाते. मात्र, चांगली माणसे राजकारणात आली तरच देश सुरक्षित असेल, असा विश्वास सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला. मीसुद्धा सामाजिक दायित्वातून राजकारणात आलो, अशी कबुली त्यांनी दिली. चांगली व्यक्ती राजकारणात नसेल तर सत्ता सेवा नव्हे, तर मेवा ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार हा हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. नोटबंदी, जीएसटी, राफेल विमान खरेदीविषयी त्यांनी मोदींना लक्ष्य केले.
 

Web Title: The Modi government ended the credibility of the CBI, the serious allegations of Sinha ended,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.