प्रल्हाद वामन पै : जुळ्या शहरातील नागरिकांची तौबा गर्दी
परतवाडा : करुणा, कौतुक, कृतज्ञता ठेवा जीवन सुखी होईल, कारण हे तीनही आचरण कुणी करीत नाही. या सर्वांचे आचरण करुन आयुष्य सुखी, समृध्द झाल्याचे वाटणार असल्याचे व्यक्तव्य प्रल्हाद वामन पै यांनी केले. जीवन विद्या मिशनव्दारा बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित प्रबोधनात ते बोलत होते.
यावेळी जुळ्या शहरातील नागरिकांची प्रबोधन ऐकण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती. जीवनात सुखी आयुष्य जगताना कृतज्ञता व्यक्त करा, त्यामुळे तुमच्या उत्कर्षाला चार चांद लागतील. कृतज्ञता ही साधना आहे. ती रोज सकाळी उठून करा, त्यामुळे आयुष्यात पुष्कळ फरक पडणार असल्याचे प्रबोधन प्रल्हाद वामन पै यांनी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार व्यक्त करताना सांगितले. कृतज्ञता ही शक्ती आहे की चुंबक आहे. माणसाला जोडण्याची शक्ती कृतज्ञता आहे. विदेशात जावून बघा तेथे दुकानात सडक नारळ निघाले तर परत घेवून दुसरे दिले जाते. आई-वडिल मुलांसोबत संवाद ठेवण्यास कमीवेळ दिला तरी चालेल. बरेचदा दिवसभर घरात जावून सुध्दा संवाद साधल्या जात नाही. पुढे बोलताना पै म्हणाले की, प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याची काळजी घेत नाही. एकमेकांवर कुरघोडी करत आहे. हेच राजकारण आधुनिक काळात सुरू आहे. त्यामुळे सद्गुरु म्हणतात की, दुसऱ्याची काठी कापून आपली काठी मोठी करु नका, स्वत: सुखी होवून दुसऱ्याला सुखी करतो, तोच खरे जीवन जगतो. त्यामुळेच सद्गुणी, करुणा, या शब्दाला जीवनात महत्त्व असल्याचे पै म्हणाले. कौतुकासंदर्भात बोलताना प्रल्हाद पै यांनी सांगितले की, कौतुक करुन शिका त्यातूनच खरी प्रेरणा मिळते, खरे कौतुक करा विनाकारण कोणाला चढू नका, त्यातून शक्ती प्रेरणा मिळते. कौतुकातूनच माणसे मोठी होत असल्याचे प्रल्हाद पै यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितले.