फेसबुकवर प्रेम, लग्न अन् तीन आठवड्यांत विस्कोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 06:16 PM2018-06-04T18:16:15+5:302018-06-04T18:16:15+5:30

तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले.

Love Facebook, Wishcott in three weeks | फेसबुकवर प्रेम, लग्न अन् तीन आठवड्यांत विस्कोट

फेसबुकवर प्रेम, लग्न अन् तीन आठवड्यांत विस्कोट

Next

- गोपाल डहाके
मोर्शी (अमरावती) : तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. लग्नानंतर मात्र जातीचा, रूपाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे तीन आठवड्यांतच तिच्या लग्नाचा विस्कोट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मला नांदायचे आहे, अशी मागणी तिने मोर्शी पोलिसांकडे केली आहे.
धामणगाव गढी येथील १९ वर्षीय ऐश्वर्या (कल्पनिक नाव) चे फेसबूकवर मोर्शी शहरातील दुर्गानगर येथील रहिवासी अभिजित सुधाकर ठाकरे (२९) याच्याशी ११ महिन्यांपूर्वी मैत्री झाली. भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यातील भेद गळून पडले. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. तो जुमानत नसल्याचे पाहून मोर्शी पोलीस ठाणे गाठले. हे समजताच तिची मनधरणी करीत त्याने पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात लग्न केले. मात्र, त्याच वेळी १७ महिने आईकडे राहण्याची लेखी अट तिच्याकडून १०० रुपयांच्या मुद्रांकावर घेतली. एवढेच नव्हे तर तिने नकार देताच अभिजितने शिवीगाळ करीत थप्पड लगावल्या आणि पट्ट्याने मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे ती धामणगावला निघून गेली. इकडे अभिजितने आईच्या कानावर सदर प्रकार घालताच ठाकरे कुटुंबीयांचे धाबे दणाणले. त्याची आई माजी भाजप तालुकाध्यक्ष असल्याने राजकीय दबाव आणला गेला. याशिवाय मुलगी खाटीक, तर अभिजित हा कुणबी समाजाचा. त्यामुळे हे प्रकरण जातीय वळणावर गेले. अभिजितला फितवून हे लग्न मोडायचेच, असा चंग ठाकरे कुटुंबीयांनी केला होता. याची भनक मुलीला पडताच तिने १८ मे रोजी तडक दुर्गानगर गाठले. दरम्यानच्या काळात अभिजित पसार झाला, तर सासू-सासरे घरात घेण्यास तयार नसल्याने तिने ठाकरे कुटुंबाच्या घरासमोर डेरा टाकला आहे. १ व ३ जून रोजी भर पावसात ती तेथेच होती. मला माझ्या नवऱ्यासोबत नांदायचे आहे, अशी तिची एकमेव मागणी आहे.
दरम्यान, तीन आठवड्यातच लग्न मोडीत निघालेल्या या युवतीने १ जून रोजी पोलीस ठाणे गाठून पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध शिवीगाळ व शारीरिक-मानसिक छळ करून त्रास दिल्याची तक्रार दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाकडे मोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.
मला नांदायचे आहे
मला माझ्या आई-वडिलांनी या प्रकरणानंतर घराबाहेर काढले आहे. अभिजितशी कायदेशीर लग्न झाले आहे आणि त्याच्यासोबत संसार करायचा आहे. पोलीस तरी मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणात न्याय देतील, अशी अपेक्षा ऐश्वर्याने सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

Web Title: Love Facebook, Wishcott in three weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.