Lok Sabha Election 2019; दोन आमदार असलेल्या सभेवर भाजपचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:13 AM2019-04-10T01:13:12+5:302019-04-10T01:14:51+5:30

भाजपक्षाचे दोन आमदार आणि दर्यापूरच्या नगराध्यक्ष सहभागी असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापुरातील प्रचारसभेवर भाजपक्षाच्याच तालुका पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्याची घटना निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडली.

Lok Sabha Election 2019; BJP boycott meeting of two MLAs | Lok Sabha Election 2019; दोन आमदार असलेल्या सभेवर भाजपचा बहिष्कार

Lok Sabha Election 2019; दोन आमदार असलेल्या सभेवर भाजपचा बहिष्कार

Next
ठळक मुद्देमुद्दा मानापमानाचा : ऐन निवडणुकीच्या तोंडवर फूट, विजयापेक्षा पदे मोठी?

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : भाजपक्षाचे दोन आमदार आणि दर्यापूरच्या नगराध्यक्ष सहभागी असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापुरातील प्रचारसभेवर भाजपक्षाच्याच तालुका पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्याची घटना निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडली.
राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय असलेल्या दर्यापुरात घडलेल्या या मानापमान नाट्यामुळे जिल्ह्यातील भाजपजनांना उमेदवाराच्या विजयाऐवजी त्यांची पदे महत्त्वाची असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात रंगली आहे.
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास अंजनगाव रोडवरील भारसाकळे यांच्या जिनिंगमध्ये भाजपा व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस युतीचे उमेदवार तथा मावळते खासदार आनंदराव अडसूळ व अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, आ. रमेश बुंदिले, नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे तथा शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी हजर होते. मात्र, या बैठकीला भाजपचे तालुका पदाधिकारी उपस्थित नव्हते. भाजपचे तालुकाध्यक्ष विजय मेंढे, शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद भाजपा गटनेता असलम घानीवाले, दादा गणोरकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनय गावंडे, किरण मोकासदार व अन्य पदाधिकाऱ्यांना या बैठकीतून डावलण्यात आल्याची माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनय गावंडे यांनी दिली. भाजपच्या मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण नसल्यामुळे कोणीही बैठकीला गेले नाही. उशिरा रात्री ही बैठक संपल्यानंतर भाजपमध्ये फूट पडल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली. या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले.

या बैठकीचे आयोजन प्रकाश भारसाकळे यांनी केले. बैठकीत त्यांनी त्यांच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना बोलाविले होते. भाजप आमदार म्हणून बैठकीला उपस्थित झालो.
- रमेश बुंदिले,
आमदार, दर्यापूर

मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी जनतेला बैठकीस बोलावले होते. नगराध्यक्षांना तसा अधिकार आहे. मीसुद्धा आमदार आहे. बैठकीसाठी जिल्हाध्यक्षांची परवानगी घ्यावी काय?
- प्रकाश भारसाकळे,
आमदार, अकोट

मला किंवा कार्यकारिणीतील कुणालाही भारसाकळे यांनी बोलाविलेल्या निमंत्रण नव्हते. त्यामुळे कुणीही बैठकीस हजेरी लावली नाही. ही बाब जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातली.
- विजय मेंढे,
तालुकाध्यक्ष, भाजप

Web Title: Lok Sabha Election 2019; BJP boycott meeting of two MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.