सर्वसामान्यांना न्याय; काँग्रेस हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:00 AM2018-03-25T00:00:32+5:302018-03-25T00:00:32+5:30

केंद्र व राज्यातील सरकारने घोषणा, आश्वासनांशिवाय काहीच केलेले नाही. त्यांच्याविरोधात कुणी बोलले, तर आवाज दाबण्यात येतो. सर्वसामान्यांना न्याय केवळ काँग्रेसच देऊ शकते. कार्यकर्त्यांनी भाजपची जुलमी राजवट हद्दपार करण्यासाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे केले.

Justice of the common people; Congress is the only option | सर्वसामान्यांना न्याय; काँग्रेस हाच पर्याय

सर्वसामान्यांना न्याय; काँग्रेस हाच पर्याय

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाणांची ग्वाही : जिल्हा काँग्रेस कमिटीचे ‘व्हिजन २०१९’ शिबिर, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

आॅनलाईन लोकमत
अमरावती : केंद्र व राज्यातील सरकारने घोषणा, आश्वासनांशिवाय काहीच केलेले नाही. त्यांच्याविरोधात कुणी बोलले, तर आवाज दाबण्यात येतो. सर्वसामान्यांना न्याय केवळ काँग्रेसच देऊ शकते. कार्यकर्त्यांनी भाजपची जुलमी राजवट हद्दपार करण्यासाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे केले.
जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘व्हिजन २०१९’ अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर येथील तेलाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी खा. चव्हाण मार्गदर्शन करीत होते. भाजपने निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. या शासनाच्या काळात शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, बेरोजगार युवकांच्या समस्यांत भर पडली आहे. शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफाधारित हमीभावाचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात हमीपेक्षा कित्येक पटीने कमी भाव असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. नोकरभरतीत कपात करून बेरोजगारांच्या आशा धुळीस मिळविल्या. हे सरकार नक्की कुणासाठी काम करते, असा सवाल चव्हाण यांनी केला.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात रोजगार निर्मितीसह शेतमालास उत्पादन खर्चावर हमीभाव याबाबत ठाम भूमिका पक्षाने घेतली आहे. सर्वसामान्यांना विश्वास देण्याचे काम आता कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. यशोमती ठाकूर यांनी शिबिराला संबोधित केले. व्यासपीठावर विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, सुलभा खोडके, पुष्पा बोंडे, शहराध्यक्ष किशोर बोरकर, श्याम उमाळकर, बंडू सावरबांधे आदी उपस्थित होते. संचालन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले. शिबिराला आजी-माजी आमदार, खासदार, जि.प., पं.स. आजी-माजी पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन कारणांमुळेच विकासदर घटला -पृथ्वीराज चव्हाण
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात आश्वासनांची पूर्तता केली नाही; उलट नोटाबंदी, घिसाडघाईने लागू केलेली जीएसटी आणि शेतकºयांबाबत नकारात्मक भूमिका या तीन कारणांमुळे देशाचा विकासदर कधी नव्हे एवढा खालावल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सरकारच्या जनहितविरोधी धोरणांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसचे हात मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
थापाड्यांना त्यांची जागा दाखवून द्या -यशोमती ठाकूर
खोटे बोला, पण रेटून बोला - म्हणजे ते खरे भासेल, असे भाजप सरकारचे धोरण आहे. या खोटे बोलणाºया मोदी आणि फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. त्या म्हणाल्या, रविवारी रामनवमी आहे. आम्हीही रामाला मानतो; परंतु राजकारण करीत नाही. गोरगरीब जनतेला फसविणारा काँग्रेस पक्ष नव्हे; हे काम मोदी शासनाचे आहे. निवडणुकीत मतदानातून त्यांना चोख उत्तर द्या, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसला अमरावतीची नेहमीच साथ -बाळासाहेब थोरात
सुरुवातीपासूनच काँग्रेसला साथ देणारा जिल्हा म्हणून अंबानगरीची ओळख आहे. त्याची चुणूक या शिबिराच्या नियोजनावरून दृष्टीस पडली. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि त्यांचे सहकारी आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांच्या एकजुटीची ही पावती असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. जिल्हा काँग्रेसच्या नियोजनबद्ध धोरणामुळे जिल्ह्यात काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याचे गौरवोद्गार थोरात यांनी काढले.
भाजप सर्व पातळ्यांवर अपयशी -बबलू देशमुख
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने आश्वासनांच्या लोणकढी थापा मारण्याचे काम केले. चार वर्षांत शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व जनतेला अडचणीत टाकण्याचे काम केले आहे. शेतकºयांना कर्जमाफी घोषित केली; पण हाती काहीच आले नाही. महागाई वाढली. सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचे दिवस आता भरले आहेत. शेतकरी व सर्वसामान्याना न्याय केवळ काँग्रेसच देऊ शकते, असे बबलू देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Web Title: Justice of the common people; Congress is the only option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.