‘नवसंजीवनी’मुळे राज्यातील दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:42 PM2018-01-23T15:42:30+5:302018-01-23T15:43:30+5:30

राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे.

Increase in the irrigation area of ​​1.5 lakh hectares due to rejuvenation! | ‘नवसंजीवनी’मुळे राज्यातील दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ!

‘नवसंजीवनी’मुळे राज्यातील दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ!

googlenewsNext
ठळक मुद्दे१०४ प्रकल्पांचा समावेश, ६,५११ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. याद्वारे एक लाख ४६ हजार ३५ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. योजनेतील ८१ प्रकल्प विदर्भातील आहेत. यावर ६,५९१ कोटी ७८ लाखांचा निधी खर्च होणार असल्याने सलग दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भाला या योजनेमुळे संजीवनीच मिळणार आहे.
शेतकरी आत्महत्याप्रवण व सलग दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यात निधीअभावी अर्धवट रखडलेले प्रकल्प आता राज्य शासनाने बळीराजा नवसंजीवनी योजनेच्या कक्षात आणले आहे. यामध्ये राज्यातील ८३ लघु प्रकल्प, व २१ मुख्य व मध्यम अशा एकूण १०४ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी २५ टक्के निधी हा केंद्रीय सहाय्यता योजनेतून उपलब्ध करण्यात येणार आहे. पर्यावरण व अन्य वैज्ञानिक मान्यता असलेल्या तसेच केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची मान्यताप्राप्त प्रकल्पांची रखडलेली कामे याद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने ३१ मे २०१६ मध्ये केंद्राला प्रस्ताव पाठविला होता, तो आता मार्गी लागला आहे.
यामध्ये राज्यातील ८३ लघु व २१ मुख्य प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची किंमत १६,०२६ कोटींची आहे. प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी ७,११५.९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातील ६९ लघु, १२ मुख्य व मध्यम अशा एकूण ८१ प्रकल्पांची किंमत १३,६४६.७१ कोटींची आहे व उर्वरित कामांसाठी ६,५९१.७८ कोटींचा खर्च येणार आहे, तर अमरावती जिल्ह्यातील ६६ लघु व ११ मुख्य व मध्यम प्रकल्पांची किंमत ५,७३४.५४ कोटींच्या घरात आहे. यातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी २,८१३.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. २५ टक्क्यांना निधी आता केंद्र शासन उपलब्ध करून देणार असल्याने प्रकल्पांच्या रखडललेल्या कामांना गती येऊन राज्यात किमान दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.

विदर्भात एक लाख हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ
बळीराजा नवसंजीवनी योजनेमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत १,०६,३२९ हेक्टर सिंचनक्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२,४३० हेक्टर, अकोला २९,६२५ हेक्टर, वाशिम ११,०७५ हेक्टर, यवतमाळ १३,६५९ हेक्टर, बुलडाणा ५,४२४ हेक्टर व वर्धा जिल्ह्यात ४,१३० हेक्टरचा समावेश असून ४४४.६८ मीटर प्रकल्प साठ्यात वाढ होणार आहे.

मराठवाड्यात ४० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ
या प्रकल्पामुळे मराठवाड्यात ३९,७०६ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १६,९६६ हेक्टर, जालना ४,२८५ हेक्टर, परभणी २१०० हेक्टर, नांदेड ७,७७८ हेक्टर, लातूर ६,३५० हेक्टर, उस्मानाबाद १,७८५ हेक्टर, व बीड जिल्ह्यात ४४२ हेक्टरवाढ प्रस्तावित आहे, तर प्रकल्प साठ्यात १८९.८५ मीटरने वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Increase in the irrigation area of ​​1.5 lakh hectares due to rejuvenation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती