हेमंत पवारांकडून धनाढ्यांचे मनोरंजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:47 AM2018-03-20T00:47:11+5:302018-03-20T00:47:11+5:30

वैद्यकीय रजेच्या कालावधीत आयुक्त हेमंत पवार हे धनाढ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांचे मनोरंजन करीत आहेत.

Hemant Pawar's entertainment entertainment! | हेमंत पवारांकडून धनाढ्यांचे मनोरंजन!

हेमंत पवारांकडून धनाढ्यांचे मनोरंजन!

Next
ठळक मुद्देहीच काय वैद्यकीय रजा ? : युवा स्वाभिमानचा सवाल, विभागीय आयुक्तांकडे दाद

आॅनलाईन लोकमत
अमरावती : वैद्यकीय रजेच्या कालावधीत आयुक्त हेमंत पवार हे धनाढ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांचे मनोरंजन करीत आहेत. अमरावतीच्या विकासाशी त्यांना कुठलेही देणेघेणे नाही. अशा बेजबाबदार आणि कर्तव्यशून्य आयुक्तांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा गर्भीत इशारा युवा स्वाभिमान पक्षाने विभागीय आयुक्तांना दिला आहे. या कार्यकर्त्यांनी सोमवारी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
१३ मार्चला युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांची खुर्ची उड्डाणपुलाला टांगली होती. त्याच दिवशी आयुक्त हेमंत पवार हे १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. असे असताना पवार यांनी रविवारी दोन खासगी कार्यक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक भवनातील ‘पाडवा पहाट’मध्ये त्यांनी गीत गायिले. सायंकाळी एका मराठी अभिनेत्रीसोबत स्टेज शेअर केला. या बाबींवर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यानी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत.
खुर्चीत बसू देणार नाही!
वैद्यकीय रजेवर असताना अन्य अधिकाऱ्यांना यवतमाळ मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र मागितले जाते, तर हेमंत पवारांसाठी वेगळा नियम आहे का? जर ते गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करत असतील तर त्यांच्या वैद्यकीय रजा खोटी नव्हे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. सुटीवर मनोरंजन करीत असतानाच, सर्वसामान्यांचे काम सोडून ते घरी फाइल बोलावून ठेकेदारांची बिले मंजूर करीत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक कामांत मोठा भ्रष्टाचार झाला. त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महावितरणने शहराचा वीजपुरवठा कापला होता. अशा अयशस्वी आयुक्तांचा युवा स्वाभिमान निषेध करीत असून, त्यांनी आता शहरातील सर्वसामान्यांची कामे करावी, अन्यथा त्यांना खुर्चीत बसू दिले जाणार नाही, असा संतप्त इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शहर उपाध्यक्ष अभिजित देशमुख, अंकुश ठाकरे, रौनक किटुकले, मंगेश कोकाटे, अमर काळमेघ, पलाश रायबोले, आदींची उपस्थिती होती.
मनीषा म्हैसकर पाठवतील का मेडिकल बोर्डाकडे?
एखाद्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय रजेबाबत प्रशासकीय प्रमुखांना शंका वाटत असेल, तर संबंधिताना मेडिकल बोर्डाकडे पाठविले जाते. संबंधित अधिकारी कर्मचारी खरोखर आजारी होता की कसे, याची खातरजमा करून मेडिकल बोर्डाकडून अहवाल दिला जातो. मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे व पशू शल्यचिकित्सक दिवंगत सुधीर गावंडे यांना तसे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. त्या धर्तीवर नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर या आयुक्त हेमंत पवार यांना रुजू करून घेताना मेडिकल सर्टिफिकेट मागतील का की पवारांसाठी वेगळे नियम आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पवारांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या कार्यकाळाची चौक शी करावी. तद्वतच आ. रवि राणा हेसुद्धा पवारांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुन चौकशीची मागणी करणार आहेत, असे युवा स्वाभिमान पक्षाने विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. स्मार्ट सिटी, पीएम आवास योजना अशा कुठल्याही योजना कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. दोन वर्षांत पवारांनी एकही ठसठशीत काम केलेले नाही. त्यांना विकासकामाचे व्हिजन नसल्याचा आरोपही युवा स्वाभिमानने केला आहे.

अन्य कुणाला पदभार देण्याबाबत शासनादेश नसल्याने काम सुरूच ठेवले आहे. अर्थसंकल्प व मार्चएंडची महत्त्वपूर्ण कामे करीतच आहे. युवा स्वाभिमानने केलेले आरोप तथ्यहीन आहेत.
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका

Web Title: Hemant Pawar's entertainment entertainment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.