Fodder main canal threat! | भरावाचा मुख्य कालवा धोक्यात!
भरावाचा मुख्य कालवा धोक्यात!

ठळक मुद्देप्रशासनाला प्रतीक्षा मुठेच्या पुनरावृत्तीची ! : उर्ध्व वर्धाच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे. तिवसानजीक मुख्य कालव्याच्या ४० किमी अंतरात सरळ विमोचकाचे गेट खराब झाले आहे. याच ठिकाणी तळेगाव ठाकूर येथे जाणारा विमोचक गाळाने ओव्हरटॅप होत असल्याने, येथीलच कालव्यावरील गेट खराब झाल्याने व मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणातून पाझर फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे भरावाचा कालवाच धोक्यात आला आहे.
यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके धोक्यात आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने कपाशी, तूर व हरभऱ्याच्या पेरणीसाठी फक्त दोन पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सध्या १८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात पाण्याची पहिली पाळी सोडण्यात आली. त्यामुळे किमी ४० मधील सरळ विमोचकाची स्थिती उघडकीस आली. या ठिकाणचा स्टेमरॉड खराब झाल्याने गेटदेखील बंद होत नाही. परिणामी कालव्याचे पाणी लगतच्या परिसरात वाहत आहे. दररोज लाखो लिटर पाण्याने परिसरातील तीन ठिकाणी तलाव तयार झाला आहे. हीच स्थिती तळेगाव ठाकूर विमोचकाची आहे. मायनर गाळाने बुजल्याने पाणी ओव्हरटॅप होऊन बाजूला पसरले. विशेष म्हणजे, कालव्याच्या अस्तरीकरणाच्या जॉइंटमध्ये झुडुपे उगवली आहेत व याच भेगांमधूनही पाणी पाझरत असल्याने मुख्य कालवाच धोक्यात आला आहे. कोट्यवधी लिटर पाणी या ठिकाणी साचले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास परिसरातील पिके खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अस्तरीकरणाच्या भेगांमधून पाझर
भराव्याच्या कालव्याला अस्तरीकरण केले असले तरी भेगांमधून व भगदाडांमधून पाणी जर पाझरत असेल, तर ग्रेडेशनवर परिणाम होतो. कालव्याच्या तळाच्या उतारावर गाळ साचतो व या ठिकाणी गवत व झाडे उगवतात व यामुळे भरावाला धोका निर्माण होतो, अशी माहिती सिंचन क्षेत्रातील एका अभियंत्याने दिली. उजव्या मुख्य कालव्यावर अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याने व हा कालवादेखील भरावाचाच असल्याने भविष्यात धोका असल्याचे सत्य नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्यात कपात; अपव्ययात लाखो लिटर
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ४१ टक्केच पाणीसाठा आहे. यामध्ये किमान पाच टक्के जरी मृत साठा गृहीत धरला तरी ३६ टक्केच साठा आहे. सिंचनाच्या पाण्यासाठी एका पाळीत सात टक्के पाणीसाठा कमी होतो. आता आणखी एक पाळी तीन आठवड्यांनी देण्यात येणार आहे. म्हणजेच २९ टक्केच साठा प्रकल्पात शिल्लक राहील. त्यामध्येही, बाष्पीभवन, औद्योगिक व शहरी वापरासाठी पाणी वापरले जाणार आहे. पाणी कपातीसाठी अमरावती शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे अन् सिंचन विभागाच्या बेपर्वाईने रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.


Web Title: Fodder main canal threat!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.