Flood of alcohol in the adoption village of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात दारूचा महापूर

ठळक मुद्देशिरजगाव मोझरीचे वास्तव : कॉँग्रेस आंदोलनाच्या पावित्र्यात

आॅनलाईन लोकमत
तिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी या मुख्यमंत्री प्रतिनिधीच्या गावात समस्यांचा डोंगर उपसला जात नसल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावलेले नाही. गावात दारूचा महापूर वाहत आहे, तर रस्त्यांनी शरीराचे दुखणे वाढविले आहे. शिरजगाव मोझरीचे वास्तव पुढे आणण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
तालुका कॉँग्रेस पदाधिकाºयांनी नुकतीच या गावाला भेट दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक गावे दत्तक घेऊन तेथे निवासी मुख्यमंत्री प्रतिनिधी नेमले. त्याला आठ महिने उलटले. मात्र, त्यामुळे गावाच्या कारभारात कितपत फरक पडला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिरजगाव मोझरीत तीन दिवसाआड पिण्याचा पाणीपुरवठा होतो. एकेकाळी येथे दारूबंदी होती. मात्र, देशी-विदेशी अशी कुठलीही दारू सहज उपलब्ध होते. ग्रामस्थांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले. मात्र, त्यावेळी खोट्या गुन्ह्यात युवकांना अडकवण्यात आले होते. हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का, असा सवाल ते उपस्थित करीत आहेत.
रस्त्याची थातूरमातूर डागडुजी
सार्वजनिक बांधकाम विभागाने मोझरी-शिरजगाव मोझरी रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. रस्त्यावरील मातीवरच डांबर टाकले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जमाफीही नाही
शिरजगावातील ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले होते. मात्र, अद्याप एकाही शेतकºयाचे यादीवर नाव झळकले नाही वा प्रत्यक्ष कर्जमाफी झाली नाही.

शिरजगावसह तिवसा तालुक्यातील चार गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली. भाजप नेते इथे भरपूर काम झाल्याचे सांगतात. मात्र, या गावांना अद्यापही निधी दिला नाही. शिरजगाव हे मॉडेल व्हायला पाहिजे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याविरोधात युवक काँग्रेस प्रतिकात्मक आंदोलन करणार आहे.
- वैभव वानखडे, युवक काँग्रेस