Find mastermind in the event of Bhima Koregaon | भीमा कोरेगाव घटनेतील मास्टरमार्इंड शोधा

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडची मागणी : सीबीआयमार्फत चौकशी करा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या घटनेचा मास्टरमार्इंड शोधून काढा. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रणजित तिडके यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव एकत्र आले होते, असे नमूद केले. यावेळी पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. मात्र, विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी षड्यंत्र रचून १ जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या कार्यक्रमावर हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरी विचारसरणीवर असल्याचा प्रहार संभाजी ब्रिगेडने केला. या घटनेमागे जातीयवादी प्रवृत्ती असल्याचा आरोप करीत मास्टरमार्इंड शोधून काढा, अशी मागणी करण्यात आली. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कठोर कारवाई करताना त्यांच्या संघटनांची चौकशी करावी. आरोपींचा शोध घेऊन तपास सीबीआयकडे सोपवावा, असे निवेदनात म्हटले आहे. यात खरा आरोपी कोण? हे लवकर समाजापुढे आणावे. जणेकरून दोन समाजात निर्माण होणारी तेढ, गैरसमज व अफवा थांबतील, असे संभाजी ब्रिगेडचे रणजित तिडके, शुभम शेरकर, संजय ठाकरे, शरद काळे, लोकेश म्हाला, शुभम बाबुरकर, सुयोग वाघमारे, कैलास चव्हाण, पीयूष साळवे, आशिष देशमुख, अक्षय खडसे आदींनी निवेदनातून म्हटले आहे.
परिवर्तनवादी विचारसरणीवर हल्ला
भीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेला भ्याड हल्ला म्हणजे परिवर्तनवादी विचारसरणीवर हल्ला होय, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी केला आहे. जातीयवादी प्रवृत्तीकडून बहुजन समाजात तेढ निर्माण करण्याचे हे कटकारस्थान आहे. या घटनेतील मास्टरमार्इंड शोधून आरोपींची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. परिवर्तनवादी लोकांना शांत डोक्याने आणि नियोजनपूर्वक तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र असल्याचेही संभाजी ब्रिगेडने प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.