डेंग्यूची मगरमिठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:54 PM2018-08-14T22:54:23+5:302018-08-14T22:55:45+5:30

दोन महिन्यांपूर्वी शहरात तुरळक आढळणाऱ्या डेंग्यूची आता अमरावती शहराला मगरमिठी पडली आहे. हजारांवर नागरिकांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असताना, महापालिका मात्र यासंबंधाने लपवाछपवीचा खेळ खेळत आहे. 'लोकमत'नेच डेंग्यूचा शिरकाव झाल्याची माहिती सर्वप्रथम उघड केली.

Dengue chemist | डेंग्यूची मगरमिठी

डेंग्यूची मगरमिठी

Next

संदीप मानकर ।
अमरावती : दोन महिन्यांपूर्वी शहरात तुरळक आढळणाऱ्या डेंग्यूची आता अमरावती शहराला मगरमिठी पडली आहे. हजारांवर नागरिकांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असताना, महापालिका मात्र यासंबंधाने लपवाछपवीचा खेळ खेळत आहे. 'लोकमत'नेच डेंग्यूचा शिरकाव झाल्याची माहिती सर्वप्रथम उघड केली. आमदार राणा यांनी या मुद्द्याची तातडीने दखल घेऊन डॉ. निचत यांच्या रुग्णालयाला भेट दिली. महापालिका आयुक्तांची कानउघाडणी केली. आयुक्तांनी यानंतरही प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे पूर्वी दक्षिणपूर्व अमरावतीत आढळलेला हा आजार शहरात सर्वत्र थैमान घालतो आहे. महापालिका आयुक्त मात्र उपाययोजना सुरू आहेत, याशिवाय दुसरे काही बोलत नाहीत.
हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळ!
डेंग्यूची बाधा झाल्याचे निश्चित निदान करण्यासाठी एनएस-वन आणि आयजीएम या रक्तचाचण्या करण्यात येतात. डेंग्यूची लागण होण्याच्या सात दिवसांपर्यंत चाचणी करावयाची असल्यास एनएस-वन ही चाचणी करावयास हवी. सात दिवस उलटून गेले असतील, तर आयजीएम चाचणी करावयास हवी. सात दिवसांच्या आत आयजीएम चाचणी केल्यास रिपोर्ट 'निगेटिव्ह' येतो. त्यामुळे डेंग्यूरुग्णास डेंग्यू नसल्याचे निदान होते. परिणामी ते त्याच्या जिवावर बेतू शकते. महापालिकेच्या बंधनानुसार रक्तनमुने यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेतच पाठवायचे असतात. परंतु, तेथे एनएस-वन कीट उपलब्ध नसल्यामुळे सात दिवसांच्या आतील रुग्णांची आयजीएम रक्तचाचणी केली जाते. ती निगेटिव्ह येते.
आमदार राणांच्या बंधूलाही डेंग्यू
डेंग्युच्या मुद्द्यावरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांची खरडपट्टी काढणारे आणि खासगी इस्पितळात भेट देऊन डेंग्यूसंबंधी महापालिकेची लपवाछपवी उघड करणारे बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्या बंधूंना डेंग्यूने कह्यात घेतले. आमदार आणि हे बंधू एकाच घरात वास्तव्यास आहेत. सामान्यांची स्थिती काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
सर्वच रुग्णालयांत पन्नासावर रुग्ण
डॉ. विजय बख्तार आणि डॉ. सचिन काळे यांच्या रुग्णालयात प्रत्येकी ६० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. डॉ. निचत यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये तर डबल सेंच्युरी पूर्ण झाली. डॉ. बोंडे हायटेक सुपरस्पेशालिटी १००, पीडीएमसी ६१, गेट लाइफ हॉस्पिटल १७ हे आकडे काही महत्त्वाच्या रुग्णालयांचे असले तरी सर्व लहान-मोठे जनरल फिजिशियन आणि हॉस्पिटलकडील डेंग्यूरुग्णांची एकंदर आकडेवारी ही डोळे विस्फारणारी आहे.
पोलीस क्राइम ब्रँचच्या प्रमुखाला डंख
अट्टल गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या क्राइम ब्रँचचे प्रमुख असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनाही डेंग्यूच्या डासाने डंख करून रुग्णालयात दाखल होण्यास बाध्य केले. रविनगर परिसरात राहत असून, यापूर्वीही येथे डेंग्यूरुग्ण आढळले आहे.

Web Title: Dengue chemist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.