कंटेनरचा हिशेब जुळेचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:24 PM2018-09-21T23:24:48+5:302018-09-21T23:25:37+5:30

सलग दोन दिवस प्रभागनिहाय कंटेनरची संख्या जुळविण्यात स्वास्थ्य अधीक्षक व निरीक्षकांना यश आलेले नाही. त्यामुळे कंटेनर संख्येमधील तफावत स्वच्छता विभागाच्या अंगलट येण्याचे संकेत आहेत.

Container accounting | कंटेनरचा हिशेब जुळेचना

कंटेनरचा हिशेब जुळेचना

Next
ठळक मुद्देस्वच्छता विभाग तोंडघशी : पालकमंत्र्यांकडे पहोचली नाही माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सलग दोन दिवस प्रभागनिहाय कंटेनरची संख्या जुळविण्यात स्वास्थ्य अधीक्षक व निरीक्षकांना यश आलेले नाही. त्यामुळे कंटेनर संख्येमधील तफावत स्वच्छता विभागाच्या अंगलट येण्याचे संकेत आहेत.
नव्याने घेतलेल्या २०० कंटेनरपैकी सुमारे ३० कंटेनरचा हिशेब जुळत नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ज्या २०८ कंटेनरचा हिशेब महापालिका प्रशासनाला २२ प्रभागांकडून प्राप्त झाला, त्यात जुन्या ३८ ते ४० कंटेनरचा समावेश आहे. त्यामुळे नव्याने घेतलेल्या २०० पैकी ३० कंटेनर कोठे आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कंटेनरच्या संख्येवर आक्षेप घेत प्रभागनिहाय कंटेनरची यादी महापालिका प्रशासनास मागितली होती. त्यानंतर आयुक्त संजय निपाणे यांनी बुधवारी रात्री मॅराथॉन बैठक घेत कंटेनरचा प्रभागनिहाय आढावा घेतला. संपूर्ण २२ प्रभागातील स्वास्थ्य निरीक्षकांनी दिलेला तो आकडा २०८ कंटेनरवर स्थिरावला. गुरुवारी सकाळी सर्व बीटप्यून व स्वास्थ्य निरिक्षकांनी आपआपल्या प्रभागातील कंटेनरचे छायाचित्र आरोग्य अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. रात्रीचा दिवस करा; मात्र गुरुवार सायंकाळपर्यत संपूर्ण कंटेनरची जागानिहाय सचित्र यादी आपल्याला लागेल, अशी तंबी त्यांनी स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे यांना दिली. मात्र, गुरुवारी आलेली शासकीय सुटी व शुक्रवारी स्वास्थ निरीक्षकांनी ती यादी न पाठविल्याने कंटेनरचा आकडा निश्चित झाला नसल्याची माहिती तिजारे यांनी दिली. कंटेनरवर क्रमांक टाकण्यात येत असल्याने तो आकडा जुळेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
खत्रींना २१३ कंटेनरची माहिती
शहरात जुने व नवे किती कंटेनर कार्यरत आहेत याबाबत बसपचे नगरसेवक ऋषी खत्री यांनी मार्च महिन्यात स्वच्छता विभागाला माहिती मागितली होती. त्यावर शहरातील पाच झोनमध्ये जुने व नवे २१३ कंटेनर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. सन २०१७ मध्ये २०० कंटेनर नविन तर तत्पुर्वी सन २०११ मध्ये ३०० निळे कंटेनर घेण्यात आले होते, ते ३०० कंटेनर निकामी झाल्याने कोठा, कार्यशाळा, सुकळी कंपोस्ट डेपो व वलगाव रोडवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सन २०११ मध्ये घेतलेले ३०० कंटेनर भंगार झाले म्हणून २०० नव्याने घेण्यात आलेत. मग खत्री यांना देण्यात आलेल्या २१३ पैकी १३ जुने कंटेनर कोठून आलेत, हा एक प्रश्नच आहे.
३० गेली कुठे ?
विशेष म्हणजे ऋषी खत्री यांना निळे, पिवळे आणि हिरवे कंटेनर मिळून २१३ ची यादी देण्यात आली. त्यात नव्याने घेतलेल्या हिरव्या कंटेनरची संख्या केवळ १७० अशी आहे. त्यामुळे नव्या २०० पैकी ३० कंटेनरबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. २०० पैकी १७० चाच पुरवठा झाला की उर्वरित ३० कंटेनर अन्य कुठल्या ठिकाणी ठेवण्यात आली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शहर स्वच्छतेबाबत शनिवारी जनता दरबार
शहरातील स्वच्छता व कचऱ्याचा प्रश्न आदींबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवार २९ सप्टेंबरला दुपारी १ ते ५ या दरम्यान जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला आहे. शहरातील साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाची बैठक घेऊन निर्देश दिले होते व स्वत: गुरुवारी शहरातील कंटेनरची पाहणी करुन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. याच अनुषंगाने हा दरबार होणार आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत आपल्या तक्रारी व म्हणणे मांडण्याची संधी जनता दरबारातून मिळणार आहे. अशा तक्रारींबाबत पालकमंत्र्यांकडून ‘आॅन दि स्पॉट’ निर्णय व कारवाई होणार आहे.

Web Title: Container accounting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.