कर्मचारी अनुपस्थित : दालनात दिवे, पंखे सुरू, अभ्यागत प्रतीक्षेत
मनीष कहाते अमरावती
येथील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दुपारी १ ते ३.३० पर्यंत संपूर्ण कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. मात्र दालनातील दिवे, पंखे नियमित सुरू होते. कामानिमित्त येणारे अभ्यागत अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते.
सर्वसामान्य जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे ‘रस्ते’ सकाळपासूनच रस्त्यावरून चालण्याला सुरुवात. त्याच रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडे आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये दूरध्वनी कक्षामध्ये फॅक्स मशीन आणि एक टेलिफोन टेबलवर ठेवला होता. मात्र कोणीही दूरध्वनी चालक त्याठिकाणी उपस्थित नव्हता. कार्यालयामधील भांडार शाखेमध्ये बाहेरून आलेल्या अभ्यागतांच्या गोष्टी रंगल्या होत्या.
रेखाचित्र शाखेमध्ये कोणीही अधिकारी वा कर्मचारी हजर नव्हते. तांत्रिक शाखा, लेखा विभाग, आस्थापना शाखा इत्यादी विभागाची स्थिती तशीच होती.
कार्यालयामध्ये एकूण ३८ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, शिपाई, कारकून, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता इत्यादी पदे आहेत. कार्यालयामध्ये विचारपूस केली असता काही कर्मचारी सुटीवर आहेत. काही जेवायला गेले, तर काही चहापानाला गेले, काही दौऱ्यावर गेले असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट होता.