Concretized roads without permission | परवानगीविनाच फोडले काँक्रीट रस्ते
परवानगीविनाच फोडले काँक्रीट रस्ते

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा प्रताप : महापालिका गप्प का? लक्षावधी रुपयांचा चुराडा

संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंमलात आणलेल्या अमृत योजनेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या एजन्सीमार्फत कामे करण्यात येत आहेत. मात्र, राधानगर, विनायकनगर परिसरात ही कामे करताना काही दिवसांपूर्वीच बांधलेल्या काँक्रीट रस्ते महापालिकेची कुठलीही परवानगी न घेताच ब्रेकिंग मशीनच्या साहाय्याने फोडण्यात येत आहेत. हा प्रकार रस्त्याचे काम करतानाच होऊ शकला असता; मात्र समन्वयाचा अभाव कायमचा आहे. याबाबत कंत्राटदारासह संबंधित अधिकाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.
अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन पाइप लाइन टाकण्याची कामे करण्यात येत आहेत. राधानगर, विनायकनगर हा परिसर मजीप्रा व्हीएमव्ही कार्यालय अंतर्गत उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यकक्षेत येतो.

उपायुक्तांना पाठविले पत्र
या परिसरात दोन किमीपर्यंत नवीन पाइप लाइनचे काम सुरू आहे. परंतु, त्याच्या काही महिन्यांपूर्वीच राधानगर, गाडगेनगर व विनायकनगर परिसरात महापालिकेने काँक्रीट रस्ते केले. कडेला पेव्हरदेखील बसविले. या कामांवर सहा कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च झाल्याची माहिती आहे. सदर रस्ते व पेव्हर पूर्ववत करून द्यावेत, असा करार महापालिकने मजीप्राशी केलेला आहे. पण, त्यामध्ये रस्त्याच्या एका बाजूने पेव्हर काढून खोदकाम करावे, असे नमूद असल्याचे शहर अभियंता जीवन सदार यांनी सांगितले आहे. काँक्रीट रस्ते फोडण्याबाबत कुठलीही परवानगी दिली नाही. नेमके हेच होत आहे. दुसरीकडे रस्ता फोेडण्यासाठी मजीप्राने महापालिकेच्या उत्तर झोन क्रमांक १ च्या उपायुक्तांना पत्र पाठविल्याचे शाखा अभियंत्यांनी सांगितले. पाइप लाइन टाकण्यासाठी काँक्रीट रस्ते फोडायचे असतील, तर मनपाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. त्या कारणाने परवानगी न घेता काँक्रीट रस्ता फोडलाच कसा, असा प्रश्न विचारला जात आहे. जर हा प्रकार नियमबाह्य असेल, तर मजीप्राचे अभियंता व सदर कंत्राटदारावर कारवाईचा बडगा का उगारू नये, असा प्रश्न विचारला जात आहे.

कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांचे काय?
नवीन पाइप लाइन टाकण्यासाठी राधानगर, विनायकनगर परिसरातील काँक्रीट रस्ते फोडण्यात येत आहेत. पेव्हरदेखील काढले जात आहेत. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेने या भागात काँक्रीट रस्त्याची कोट्यवधी रुपयांची कामे केली. हे रस्ते करतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वा मनपाने या परिसरात नियोजित पाइप लाइनचे कुठलेही काम काढले नाही. मात्र, रस्ता पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते फोडण्यात आले आहेत. ते बुजविण्यात आले तरी मजबुतींवर प्रश्नचिन्ह कायमचा लागला आहे. महापालिकेने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचा व जनतेच्या पैशांचा चुरडा करण्याचा अधिकार दिला कुणी, हा प्रश्नही पुढे येत आहे.

जनरेटरने ध्वनिप्रदूषण
काँक्रीट रस्ता फोडण्यासाठी वापरण्यात येणाºया ब्रेकिंग मशीन व त्यासाठी लागणाºया ट्रॅक्टरवरील जनरेटरचा कर्कश्श आवाज ध्वनिप्रदूषण करीत आहे. दोनशे ते चारशे फुटांपर्यंत हा आवाज सहनदेखील होत नाही. नागरिक या आवाजाने त्रस्त असून, कमी आवाजाचे जनरेटर व मशीनचा वापर करा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

नाशिकच्या कंत्राटदाराला काम
नाशिक येथील एका कंत्राटदाराला शहरात अमृत योजनेंतर्गत ११४ कोटींची कामे करण्यात येत आहे. कामे नियमबाह्य पद्धतीने होत असून, विलंब केला जात असल्याने यामध्ये कारवाईचा बडगा उगारावा, अशीदेखील मागणी होत आहे.

महापालिकेचा कुठलाही रस्ता फोडला तरी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला तो तातडीने पूर्ववत करून द्यावा लागणार आहे. याबाबत तसे अ‍ॅग्रिमेंट झाले आहे. कामात दिरंगाई होत असल्याने आतापर्यंत मजीप्राला आठ ते दहा पत्र दिले आहेत.
- जीवन सदार, अतिरिक्त शहर अभियंता, महापालिका

काही कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ब्रेकिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याकरिता मनपाच्या उपायुक्तांना पत्र देण्यात आले आहे. कमी आवाजाचे जनरेटर वापरण्यासाठी कंत्राटदाराला सांगण्यात येईल.
- सिद्धार्थ शेंडे
शाखा अभियंता, मजीप्रा


Web Title: Concretized roads without permission
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.