खान यांच्या पाठीवर शिक्षणाधिकारी पदाचे ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:56 PM2017-11-17T23:56:21+5:302017-11-17T23:57:21+5:30

महापालिकेचे शिक्षणाधिकारी इ.झेड. खान यांनी पदमुक्ततेसाठी धडपड चालविली आहे.

The burden of education officer on the back of Khan | खान यांच्या पाठीवर शिक्षणाधिकारी पदाचे ओझे

खान यांच्या पाठीवर शिक्षणाधिकारी पदाचे ओझे

Next
ठळक मुद्देकार्यमुक्ततेसाठी धडपड : महापालिकेला पूर्णवेळ शिक्षणाधिकाºयाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचे शिक्षणाधिकारी इ.झेड. खान यांनी पदमुक्ततेसाठी धडपड चालविली आहे. महापालिकेतून कार्यमुक्त होण्यासाठी खान यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याचे पत्रही मिळविले. तथापि, कार्यमुक्त करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे सांगत आयुक्तांनी त्यांना परतवले.
शासकीय अध्यापक विद्यालयात प्राचार्य असलेल्या इ. झेड. खान यांनी महापालिकेत शिक्षणाधिकारी पदावर पदस्थापना मिळावी, अशी विनंती शिक्षण आयुक्तांना केली होती. त्या विनंतीनुसार खान यांच्याकडे २९ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रान्वये महापालिकेचा शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. मात्र, ते महापालिकेत रमले नाहीत. मध्यंतरी त्यांच्या राजीनाम्याच्या वावड्याही उठल्या होत्या. महापालिकेत उपायुक्त (सामान्य) नरेंद्र वानखडे आणि खान यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य जगजाहीर आहे. त्याबाबतची नाराजी खान यांनी वेळोवेळी आयुक्तांच्या कानावर घातली. त्याचा परिणाम म्हणून की काय, खान हे शिक्षणाधिकारी म्हणून ठसा उमटवू शकले नाहीत. गणवेश असो वा अन्य बाबी, खान यांच्या कार्यकाळात त्याला फारसा वेग आला नाही. त्यांच्या कार्यकाळात कधी नव्हे ती शिक्षण विभागाची रया गेली. खान नव्हे तर दोन लिपिकच शिक्षण विभागत चालवत असल्याची ओरड होऊ लागली. अशातच शिक्षण व क्रीडा विभागाने ७ जुलै २०१७ रोजी खान यांची बदली अमरावती जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून केली. ११ जुलैला ते उपशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. आता तरी महापालिकेचे शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सुटेल, अशी आशा खान यांना निर्माण झाली. महापालिकेच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत राहील व तो पुढील आदेश माध्यमिक उपशिक्षणाधिकारी म्हणून झाल्याचे पत्र जि.प.च्या सीईओंनी खाना यांना दिले. महापालिकेतील अतिरिक्त प्रभार संपुष्टात आला, असे गृहीत धरून आपण उपशिक्षणाधिकारी माध्यमिक या पदाचा पदभार पूर्णपणे स्वीकारण्याचे आदेश खान यांना जि.प. सीईओंनी दिलेत. ते आदेश घेऊन खान यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्तांची भेट घेतली. त्यांना सीईओंचे पत्र दाखविले. मात्र, आपल्याकडे महापालिकेतील अतिरिक्त कार्यभार आपण वा सीईओंनी सोपविला नव्हता. त्यामुळे तो काढून घेण्याचा अधिकारही नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे खान यांचा भ्रमनिरास झाला.

महापालिकेत शिक्षणाधिकारी पदाच्या अतिरिक्त प्रभारातून मुक्त करावे, यासाठी खान यांनी पत्र दिले. तथापि, त्यांची नियुक्ती महापालिका स्तरावर न झाल्याने त्यांच्या कार्यमुक्तीसाठी शासनादेश हवेत.
- हेमंतकुमार पवार,
आयुक्त, मनपा.

Web Title: The burden of education officer on the back of Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.