The bond awaiting the indefinite help | बोंड अळीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

ठळक मुद्दे२० हजार ९० शेतकऱ्यांची कपाशी बाधित : १७६ हजार हेक्टरमध्ये नुकसान

आॅनलाईन लोकमत
चांदूरबाजार : २०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. ही स्थिती राज्यभर सर्वदूर सारखीच असल्याने शासनाने कापूस पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून त्याप्रमाणे अहवालही शासनास सादर करण्यात आला तसेच शासकीय नियमानुसार मदतीसाठी लागणाऱ्यां अनुदानाच्या रकमेचेही मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून मदतीचा हात शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना अजूनही मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
गुलाबी बोंडअळीचा फटका तालुक्यातील २० हजार ९० शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये कोरडवाह क्षेत्रातील ९ हजार १७० शेतकऱ्यांचा, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ९२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचा रीतसर अहवाल स्थानिक तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तिकरीत्या शासनास सादर केला आहे. अहवालानुसार कोरडवाहूच्या ८ हजार २६६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार ९९ हेक्टर इतके क्षेत्र बोंडअळीने ३३ टक्क्यांच्या वर बाधित झाले आहे, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ५४२ कपाशी पेऱ्यापैकी ८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांच्या वर नुकसानग्रस्त झाले आहे. या सर्वांना शासकीय नियमानुसार मदतीची मागणी शासनाकडे अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
अहवालात प्रचलित शासकीय मदत धोरणानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टर ६ हजार ८०० रुपयांची, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदतीची मागणी करण्यात आली आहे.
१५ कोटी ३४ लाखांची मागणी
गुलाबी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रासाठी अहवालात १५ कोटी ३४ लाख ७१ हजार ७११ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ४ कोटी १० लाख ६ हजार ८५६ रुपये, तर बागायतीसाठी ११ कोटी २४ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी मदतीचा या अहवालात समावेश नाही.
बागायती क्षेत्रातील नुकसान ८ हजार हेक्टरमध्ये
तालुक्यात एकूण १८ हजार हेक्टरच्या वर कपाशीचा पेरा आहे. सर्वेक्षण अहवालानुसार यापैकी १४ हजार ४०७ हेक्टर कपाशीचे क्षेत्र ३३ टक्के च्या आत बोंडअळीने नुकसानग्रस्त झाले आहे. यात ६ हजार १०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू, तर ८ हजार ३०८ हेक्टर बागायती कपाशीचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त झाले आहे.