जलसंकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:33 PM2017-09-21T23:33:55+5:302017-09-21T23:34:12+5:30

Avoid water conservation | जलसंकट टळले

जलसंकट टळले

Next
ठळक मुद्देपावसाचे ‘कमबॅक’ : तीन तालुक्यांत अतिवृष्टी; सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाच्या दमदार ‘कमबॅक’ मुळे जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे संकट टळले आहे. अमरावती जिल्ह्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झालअसून हवामान खात्याने पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अमरावतीकरांना पाणीपुरवठा करणाºया उर्ध्व वर्धा धरणातही सातत्याने पावसाचा येवा सुरूच असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत या धरणात ९४ टक्के पाण्याची नोंद करण्यात आली. अशीच स्थिती राहिल्यास येत्या ४८ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याचे संकेत धरण प्रशासनाने दिले आहेत.
मंगळवार व बुधवारी नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जांब व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अप्पर वर्धा धरणात जलसाठा वाढला आहे. त्याअनुषंगाने नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी सिंभोरा धरणातील अत्यल्प पाणीसाठ्याने मजिप्रासह नागरिक आणि शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविले होते. त्यामुळेच यावर्षी धरण शंभर टक्के भरेल की नाही, याची शाश्वती नसल्याने पाणीकपातीचे धोरण अवलंबिले जात होते. मात्र, पण बुधवारी नागपूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे काटोल तालुक्यातील जांब व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंभोरा ते कोंडण्यपूर पर्यंतच्या नदीकाठावरील गावांसह तसेच वर्धा जिल्ह्यातील देऊरवाडापर्यंतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी सांगितले.
मध्यप्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र
अमरावती : अमरावती तालुक्यातील शिराळा मंडळात ८५ मि.मी. तर अचलपूर तालुक्यातील अचलपूर मंडळात १००.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अचलपूरात अतिवृष्टी झाली आहे. परतवाडा मंडळात ७३.३ मि.मी. व वरूड तालुक्यातील पुसला मंडळात ७५मि.मी.पाऊस झाला आहे. खोलगट भागातील रहिवाशांना व नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेशवर ठळकपणे कमी दाबाचे क्षेत्र राहणार असून चक्राकार वारे वाहणार आहेत. मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकणवर चक्राकार वारे असून कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच गोवा ते कर्नाटक कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे.

नागपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली असून जांब व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अप्पर वर्धा धरण ९४ टक्के भरले आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास दोन दरवाजे उघडले जातील. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
- प्रमोद पोटफोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून चार दिवस विखुरलेला पाऊस राहणार आहे.
- अनिल बंड,
हवामान तज्ज्ञ अमरावती.
 

पाणलोेटक्षेत्रात ७२१ मिमि पाऊस
अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ७२१ मि.मी. पाऊस झाला आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत वार्षिक ९०० मि.मी.पाऊस अपेक्षित आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे २४ तासांत जलसाठ्यात ७ टक्यांनी वाढ झाली आहे. संभाव्य पाणीटंचाईची समस्या आता दूर झाली आहे. नागपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५३ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती आहे. अप्परवर्धा धरणाचा जलसाठा समाधानकारक असल्याने आता शहरात पाणीटंचाई भेडसावणार नाही.

नागरिकांना मिळणार दिलासा
पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे अप्परवर्धा धरणातील जलस्तर खालावला होता. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई निस्तरण्यासाठी जीवन प्राधिकरण व महापालिकेच्या अधिकाºयांनी यासंदर्भात बैठक घेऊन शहरात काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. तसेच सिंचनाच्या पाण्यातही कपात केली होती. मात्र आता धरण ९४ टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. हवामान विभागाने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने येत्या ४८ तासांत अप्परवर्धा धरणाचे दोन दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.

२४ तासांत २०.५ मिमी
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २०.५ मिमी पाऊस पडला. यातही प्रामुख्याने उर्ध्व वर्धा प्रकल्प क्षेत्रातील मोर्शी तालुक्यात ४२.४ व वरूड तालुक्यात ४८.१ मिमी पाऊस पडला. तसेच मध्यप्रदेशात देखील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने उर्ध्व वर्धा प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला आहे.
प्रकल्पांमधील जलसाठा
शहानूर प्रकल्पात ४१.५३ टक्के, चंद्रभागा ६३.५९ टक्के सपन ७०.३४ टक्के जलसाठा आहे. चांदूरबाजारमधील पूर्णा प्रकल्यात ९२ टक्के पाणी असून तीन गेट १० सें.मी.ने उघडले आहेत.
 

Web Title: Avoid water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.