अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस रडारवर, अमरावती विद्यापीठाच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 05:43 PM2019-06-10T17:43:34+5:302019-06-10T17:43:52+5:30

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाचा पेपरफूट प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati University paper-leak investigation started | अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस रडारवर, अमरावती विद्यापीठाच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू

अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस रडारवर, अमरावती विद्यापीठाच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू

Next

अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाचा पेपरफूट प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अमरावती शहरातील काही अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस रडारवर असल्याची माहिती हाती आली आहे.

पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या तक्रारीन्वये आशिष राऊत (रा. बोर्डी, ता. अकोट जि. अकोला) ज्ञानेश्र्वर बोरे (रा. उकळी ता. मेहकर जि. बुलडाणा) या दोघांविरूद्ध फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पोलिसात देण्यापूर्वी अमरावती विद्यापीठाने प्राथमिक स्तरावर याची चौकशी पूर्ण केली. पेपरफूट प्रकरणाचा मास्टर मार्इंड कोण? हे शोधूनदेखील काढले. त्यानंतर ४ जून रोजी सिनेट सभेत सदस्यांच्या मागणीनुसार कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी त्रीसदस्यीय समिती गठित करून प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल गोळा केल्याने यातून बहुतांश बाबी स्पष्ट झाल्यात. पेपरफूटप्रकरणी आरोपींकडून मोबाइल जप्त करण्यात आला आहे. ही सर्व पार्श्वभूमी विद्यापीठ प्रशासनाने आपल्या स्तरावर पूर्ण केल्यानंतरच पोलिसांत तक्रार नोंदविली. आता केवळ पोलिसांनी पेपर ‘लीक ’प्रकरणी यात कुणाचा सहभाग, हे शोधून काढण्याच्या दिशेने तपास आरंभला आहे. आशिष राऊत आणि ज्ञानेश्र्वर बोरे या दोघांची कनेक्टिव्हीटी, नेटवर्क शोधण्याच्या दिशेने तपास सुरू आहे. यातील दोन्ही आरोपींचे बयाण नोंदविल्यानंतर अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस पोलिसांच्या रडारवर असणार आहे. राऊत आणि बोरे यांचे काही अभियांत्रिकीच्या खासगी क्लासेसच्या संचालकांसोबत मधुर संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

लग्न जुळले अन् आशिष पेपरफूट प्रकरणात अडकला
अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अस्थायी कर्मचारी म्हणून आशिष राऊत कार्यरत होता. आशिष हा संगणक हाताळण्यात एक्सपर्ट आहे. दरम्यान विद्यापीठात नोकरी करीत असल्यामुळे त्याचे लग्नदेखील जुळले. मात्र, आता अचानक तो पेपरफूटप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आल्याने त्याच्या लग्नप्रसंगावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेपर ‘लीक’ प्रकरणाचे धागेदोरे लांबदूर असल्याप्रकरणी पोलिसांनी त्यादिशेने तपास चालविला आहे.

पेपरफूटप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. नेमके तक्रारीत कोणती बाब आहे, त्यादिशेने तपास केला जाईल. यातील दोषींना न्यायालयातून कठोर शासन होण्याच्या दिशेने तपास केला जाईल.
   - राजू लेवटकर,
    तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

Web Title: Amravati University paper-leak investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.