Amravati : Drought crisis on Samrudhi highway, how will water get in drought? | समृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ, दुष्काळात पाणी कसं मिळणार ?
समृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ, दुष्काळात पाणी कसं मिळणार ?

ठळक मुद्देमहामार्ग उभारण्यासाठी लागणारे 8 लाख घनमीटर पाणी आणायचे कुठून?प्रकल्पासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार

मोहन राऊत/धामणगाव रेल्वे (अमरावती) : विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ पोहोचली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे 8 लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. जलस्रोत शोधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ नागपूर-मुबंई कृषिसमृद्धी महामार्गाच्या कामाला शेतकऱ्यांकडून जमीन हस्तांतरणानंतर गती आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतून जाणाऱ्या ७३ किलोमीटरच्या रस्त्याचे मातीकाम वेगाने होत आहे. त्यानंतर काँक्रीट पिलर उभारणीला सुरुवात होईल. त्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे.

दुष्काळात पाणी मिळणार कसे?
मागील तीन वर्षांपासून तिन्ही तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीत सातत्याने घटत  आहे. यंदा धामणगाव रेल्वे तालुक्यात पाऊसच नाही. कृषी समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागातील १३ गावे पाणीटंचाईने होरपळत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले नाही. अशात कृषिसमृद्धी महामार्गाला पाणी द्यायचे तरी कोठून, असा सवाल महसूल विभागाला पडला आहे.

लोअर वर्धा, बेंबळावर भिस्त
७३ किलोमीटर रस्त्याच्या बांधकासाठी यावर्षी दीड लाख घनमीटर, पुढील तीन वर्षांत आठ लाख घन मीटर पाण्याची आवश्यकता आहे वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या अधिनस्थ बेंबळा प्रकल्पाचे पाणी या महामार्गासाठी वापरता येणार आहे. एनसीसी कंपनीने आपली डिमांड जिल्हा प्रशासनाला नुकत्याच झालेल्या कृषिसमृद्धीच्या मासिक मीटिंगमध्ये दिली आहे. यंदा मुरूम वापरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खदानीत पुढील वर्षी पाणी साठवून ते महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यासंबंधी उपायोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने एनसीसी कंपनीला दिले आहेत. पिण्यास अयोग्य पाण्याचा साठा बांधकामासाठी वापरता येणार आहे.

तीन तालुक्यांतील ७३ किमी कृषिसमृद्धी महामार्गासाठी यंदा दीड लाख घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासन उपाययोजना राबवित आहे. पाण्यामुळे या प्रकल्पाचे काम थांबणार नाही.- अभिजित नाईक, एसडीओ, चांदूर रेल्वे

महामार्ग उभारण्याला गती आली आहे. बांधकामासाठी लागणा-या पाण्याची डिमांड एनसीसी कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. - नीरजकुमार, जनरल मॅनेजर, एनसीसी.
 


Web Title: Amravati : Drought crisis on Samrudhi highway, how will water get in drought?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.