स्क्रब टायफस आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 07:45 PM2017-10-31T19:45:19+5:302017-10-31T19:46:38+5:30

कोकणातील कुडाळ व सावंतवाडी येथील दोन रुग्ण स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे.

Alert to the healthcare system for the prevention of scrub typhus illness | स्क्रब टायफस आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट

स्क्रब टायफस आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट

googlenewsNext

 अमरावती - कोकणातील कुडाळ व सावंतवाडी येथील दोन रुग्ण स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे. ‘रिकेटशिअल’ आजारात मोडणारा स्क्रब टायफस कीटकापासून मानवात संक्रमित होतो. महाराष्ट्रासह सात राज्यांवर या आजाराचे सावट असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि वेल्लोरमध्ये सर्वप्रथम स्क्रब टायफसची नोंद झाली होती. सिक्कीम, हिमाचल, नागालँड आणि मणिपूरमध्ये काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सन २००४ मध्ये जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत हिमाचल प्रदेशात केलेल्या एका अभ्यासात रिकेटशिअल आजाराची नोंद झाली. त्यानंतर २०१७ मध्ये देशभरात विविध ठिकाणी रिकेटशिअल आजाराचे रुग्ण तुरळक स्वरूपात आढळून आलेत. यामध्ये स्क्रब टायफसचे प्रमाण अधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य सेवा सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे. 
नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले. काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील सिंदेवाडी गावातही इपिडेमिक टायफस आजाराचा उदे्रक झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, महापालिका व जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर प्रभावी उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी डॉक्सीसायक्लिन व अझिथ्रोमायसिन यांसारखे अँटिबायोटिक उपयुक्त आहेत. तूर्तास महाराष्ट्रात स्क्रब टायफसचे सावट असले तरी घाबरून जाऊ नये, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 
पाऊस पडला की, स्क्रब टायफसचे रुग्ण आढळतात. ओरिएन्शिया सुसुगामुशी नामक बॅक्टेरियामुळे होणारा हा अतिशय गंभीर आजार आहे. स्क्रब टायफसची पहिली नोंद जपानमध्ये १८९९ साली झाली. भारतात दुस-या महायुद्धाच्या वेळी आसाममध्ये या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली होती.

काय आहे स्क्रब टायफस?
या आजारात ज्या ठिकाणी ‘चिगर’ चावतो, तेथे भाजल्यासारखे व्रण येतात. साधारणपणे पानावर वाढणाºया कीटकांपासून स्क्रब टायफस होतो. या कीटकाने चावा घेतल्यानंतर त्याच्या सोंडेतील विषाणू रक्तामार्फत शरीरात प्रवेश करतात. अतिशय सूक्ष्म असलेला हा किडा उकिरडे, शेणखत आणि काडीकचºयावर जगतो. 

मानव हा आकस्मिक ‘होस्ट’
ट्राम्बिक्यूलिड माइटचा लार्व्हा, ज्याला ‘चिगर’ म्हणतात, ते चावल्याने ओरिएन्टा सुसुगामुशी हे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. जेथे झाडेझुडुपे किंवा गवत असते, त्यावर हे चिगर असतात. गवत कापताना ते माणसाला चावतात. मानव हे त्यांच्यासाठी आकस्मिक होस्ट आहे. हे चिगर उंदरांना चावतात आणि तेथून रोग पसरतो. मोठी माइट चावत नाही आणि ती जमिनीवरच असते. चिगर लार्व्हाचा आकार सूक्ष्म असतो. त्यामुळे ते डोळ्यांनी दिसत नाहीत. ते चावल्याच्या ठिकाणी दुखतही नाही. चिगर चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी लक्षणे दिसायला लागतात.

स्क्रब टायफसची लक्षणे 
‘स्क्रब टायफस’ या आजारात झटके येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ताप येणे अशी लक्षणे आढळतात. हा ताप १०४ डिग्रीपर्यंत राहतो. साधारण २४ तासांच्या आत थकवा येतो. शरीराचे अवयव, स्रायू, सांधे दुखू लागतात. या आजाराचे वेळीच निदान झाले नाही, तर शरीरात दबा धरून बसलेले हे परजिवी मेंदू, मूत्रपिंडाची क्रिया बंद पाडू शकतात. साधारणपणे ताप आणि काविळीची लक्षणे आढळून आल्यानंतरही हा आजार अनेकदा डोके वर काढतो. 

सिंधुदुर्गमध्ये दोन रुग्ण स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क आहे. विभागात अद्याप या आजाराची लागण नाही. वेल फिलिक्स ही चाचणी निदानासाठी उपयुक्त आहे. 
- नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, आरोग्य मंडळ अकोला

Web Title: Alert to the healthcare system for the prevention of scrub typhus illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य