जिल्हा परिषदेचे वाभाडे; आंबेडकर भाजपाच्या ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:59 PM2019-04-12T12:59:04+5:302019-04-12T12:59:48+5:30

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित पहिल्याच सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनाच लक्ष्य करण्यात आले.

Zilla Parishad; Ambedkar is on the radar of BJP! | जिल्हा परिषदेचे वाभाडे; आंबेडकर भाजपाच्या ‘रडार’वर!

जिल्हा परिषदेचे वाभाडे; आंबेडकर भाजपाच्या ‘रडार’वर!

Next

- राजेश शेगोकार
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित पहिल्याच सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनाच लक्ष्य करण्यात आले. या सभेत मुख्यमंत्र्यांसह उमेदवार व खासदार धोत्रे यांनी अ‍ॅड. आंबेडकरांच्या नेतृत्वातील भारिप-बमसंची गेल्या २५ वर्षांपासून सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढत लोकसभेची लढाई वंचितसोबतच असल्याचे संकेत दिले आहेत. शिवाय पुढील ‘लक्ष्य’ जिल्हा परिषदेचे असेल, असा इशारा देत अ‍ॅड. आंबेडकरांना ‘रडार’वर घेत त्यांच्या शक्तिस्थानावरच प्रहार करण्यात आला आहे.
उमेदवार संजय धोत्रे यांनी प्रास्ताविकातच जिल्हा परिषदेतील या कारभाराचे वाभाडे काढले. गेल्या पाच वर्षांत अकोल्यास इतर शहरे व ग्रामीण परिसरातील झालेल्या विकासाची तुलना करताना त्यांनी शहरातील विकासाचे श्रेय त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या ताब्यात असल्याचे अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्हा परिषद ही यंत्रणा आहे; मात्र या यंत्रणेत ‘रिमोट कंट्रोल’ने सत्ता चालविली जात असल्याने गावे चमकदार झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विकासाचा निधी दिला जातो; मात्र हा विकास ज्या जिल्हा परिषदेच्या पाइपलाइनमधून जातो, त्या पाइपलाइनला भ्रष्टाचाराचे लिकेजेस असल्याने विकास होत नाही. त्यामुळे आगामी काळात ही पाइपलाइनच बदलवून टाकू, अशा स्पष्ट शब्दात धोत्रे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अ‍ॅड. आंबेडकरांनाच आव्हान दिले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नावावर मते मागणाऱ्यांनीच ग्रामीण जनतेला विकासापासून दूर ठेवल्याचा आरोपही धोत्रे यांनी केला. त्यांच्या प्रास्ताविकाचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी थेट अ‍ॅड. आंबेडकरांवरच निशाणा साधला. आंबेडकरांकडे कोणतीही नीती नाही, धोरण नाही. त्यांनी जिल्हा परिषदेचे वाटोळे केले, अशा स्पष्ट शब्दात वाभाडे काढल्याने लोकसभेच्या प्रचारातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून अ‍ॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बमसंकडे अकोला जिल्हा परिषदेची सत्ता आहे. अकोल्याचा विचार केला तर लोकसभा व विधानसभा मतदारसंघांना ‘काँग्रेसमुक्त’ करण्याचा करिष्मा करणाºया भाजपाने महापालिकेतही एकहाती सत्ता आणली. अगदी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या सोबतीचीही भाजपाला गरज भासली नाही; मात्र जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्याचे भाजपाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. डिसेंबर २०१८ मध्ये मुदत संपलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याच्या मार्गावर असतानाच निवडणुकीतील आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात अडकल्यामुळे सध्या जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळाली व निवडणुका टळल्या. त्यामुळे लोकसभेपूर्वी होणारी रंगीत तालीम होऊ शकली नाही. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी ‘वंचित बहुजन आघाडी’ स्थापन करून भाजपा व काँग्रेससमोर सक्षम पर्याय उभा केला आहे. या पर्यायाची दखल घेत भाजपाने गुरुवारच्या प्रचारसभेत जिल्हा परिषद ‘टार्गेट’ करून आंबेडकरांना घेरण्याची रणनीती स्पष्ट केली आहे.

काँग्रेसच्या उमेदवारावर टीका टाळली!
मुख्यमंत्र्यांसह उमेदवार संजय धोत्रे यांनी मोदीमय विकासाचे चित्र उभे करताना ‘वंचित बहुजन आघाडीवर नाव घेऊन टीका केली, तर काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्धा वेळ गेला; मात्र स्थानिक उमेदवारावर दोघांच्याही भाषणात एकाही शब्दाने टीका करण्यात आली नाही.

 

Web Title: Zilla Parishad; Ambedkar is on the radar of BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.