अमरावती, दि. 13 - अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण, हे शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे नव्या कुलगुरूपदासाठी पाच नावांची यादी सादर करण्यात आली आहे. यात अकोला कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता विलास भाले, आयसीएआरचे एस.के.चौधरी, भोपाळ येथील एम.के.सिंग, दापोलीचे मोहाळकर आणि अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले यांचा समावेश आहे.

कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपालांकडे आॅनलाईन नामांकन दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार चाचणीअंती पाच जणांची नावे कुलगुरूपदासाठी मुलाखतीकरिता निवडण्यात आली आहेत. कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळविण्यासाठी विदर्भातील दोन प्रमुख दावेदार शर्यतीत आहेत. मात्र, ज्यांच्या पाठीशी राजकीय पाठबळ असेल तीच व्यक्ती कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होईल, असे संकेत आहेत. भावी कुलगुरूंची मुलाखत हे राज्यपाल घेणार असले तरी राजकीय ताकद कुणाच्या पाठीशी, हेदेखील महत्त्वाचे ठरणारे आहे.

कुलगुरू निवडताना मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांचे मतदेखील जाणून घेतले जाईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. विदर्भाच्या कृषीक्षेत्रात अतिशय महत्त्वाचे योगदान असलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची धुरा विदर्भपुत्राच्या हाती येण्याचे संकेत आहेत. अमरावतीचे नंदकिशोर चिखले यांचे नाव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.