Two players in the Ranji Trophy final | रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अकोल्याचे दोन खेळाडू
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अकोल्याचे दोन खेळाडू

ठळक मुद्देविदर्भ संघात रवी ठाकूर व आदित्य ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दिल्ली विरुद्ध विदर्भ या संघामध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघात अकोला क्रिकेट क्लबचे रवी ठाकूर व आदित्य ठाकरे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात आदित्य ठाकरे व रवी ठाकूर यांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. अकोल पोलीस विभागात कार्यरत डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर हा २0१२ पासून विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. आदित्य ठाकरे याने १६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले असून, मलेशिया येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. न्यूझिलंड येथे होणार्‍या १९ वर्षाखालील विश्‍वकप स्पर्धेकरिता त्याची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पहिल्या दिवशी त्याने पहिल्याच षटकात एक बळी मिळविला आहे. अकोला क्रिकेट क्लबच्या खेळाडूंची विदर्भ संघात निवड होणे ही अकोल्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी सांगितले.
या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिन विजय देशमुख, कैलाश शहा, दिलीप खत्री आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
 


Web Title: Two players in the Ranji Trophy final
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.