अवैध उत्खनन, शिक्षकांच्या हलगर्जीमुळेच दोन मुलांचा मृत्यू; मुख्याध्यापक, शिक्षक, कंत्राटदारांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:22 PM2018-06-30T14:22:20+5:302018-06-30T14:26:20+5:30

मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढत मुख्याध्यापक, शिक्षक व अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरले आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली.

 Two children die due to illegal mining, teachers' absence; Offense against teachers, contractors | अवैध उत्खनन, शिक्षकांच्या हलगर्जीमुळेच दोन मुलांचा मृत्यू; मुख्याध्यापक, शिक्षक, कंत्राटदारांवर गुन्हा

अवैध उत्खनन, शिक्षकांच्या हलगर्जीमुळेच दोन मुलांचा मृत्यू; मुख्याध्यापक, शिक्षक, कंत्राटदारांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देदाळंबी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करूण अंत झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढत मुख्याध्यापक, शिक्षक व अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरले आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली.मुख्याध्यापक रामेश्वर वक्टे, संजय कुकडे, प्रभारी मुख्याध्यापक नंदकिशोर ठाकरे, विश्वास राऊत, कंत्राटदार मोहित देशमुख यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३४ नुसार गुन्हा.


बोरगाव मंजू ( अकोला) -दाळंबी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करूण अंत झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी उमटले. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढत मुख्याध्यापक, शिक्षक व अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरले आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी घटनेला जबाबदार लोकांवर कारवाईसाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास रोखून धरत चक्का जाम आंदोलन केले. अखेर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दाळंबी येथील श्री शंकर विद्यालयात गौरव सत्यवान वाहुरवाघ(१३), संघर्ष सुभाष चक्रनारायण(१३) हे दोघे सातव्या वर्गात शिकत होते. २८ जून रोजी दोघे शाळेत गेले होते. शाळा सुरू असताना या दोन विद्यार्थ्यांनी शौचास जाण्यासाठी शिक्षकांना परवानगी मागितली. शाळेत शौचालय असतानाही त्यांना बाहेर शौचास जाण्यास सांगितले. शाळेपासून अवघ्या वीस मीटर अंतरावर ग्राम पंचायतमधील ई-क्लास गट क्रमांक ३७२ या जागेवर अवैध उत्खनन करून अंदाजे वीस फूट खोल व पन्नास फूट लांब व वीस फूट रुंद असा मोठा तलाव याठिकाणी खोदण्यात आला. उत्खनन करून तयार केलेल्या तलावात पावसाचे पाणी साचले. या तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन विद्यार्थ्यांचा बुडून करूण अंत झाला. या प्रकरणात सत्यवान वाहुरवाघ व सुभाष चक्रनारायण रा. दाळंबी यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत शाळेच्या हलगर्जीमुळे या विद्यार्थ्यांचे नाहक बळी गेल्याचा आरोप केला. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी श्री शंकर विद्यालय कोळंबी येथील मुख्याध्यापक रामेश्वर वक्टे, संजय कुकडे, प्रभारी मुख्याध्यापक नंदकिशोर ठाकरे, विश्वास राऊत, कंत्राटदार मोहित देशमुख यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.  


ग्राम पंचायतने केली होती तक्रार!
श्री शंकर विद्यालयाच्या नजीकच करण्यात आलेल्या या अवैध उत्खननाबाबत कोळंबी ग्राम पंचायतने तहसील, पोलीस ठाणे, जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने या दोन विद्यार्थ्यांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेला महसूल विभागही जबाबदार असल्याचा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी महसूल विभागावरही गुन्हा दाखल केला आहे.


 महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
दाळंबी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी दाळंबी येथील संतप्त ग्रामस्थांनी भारिप-बमसंच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, गजानन गवई, सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे, सुनील वानखडे, अण्णा वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली दीड तास चक्काजाम आंदोलन केले. तेव्हा त्याची दखल घेऊन महसूल उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पोलीस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच रास्ता रोको आंदोलन मागे घेतल्यावर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

 

Web Title:  Two children die due to illegal mining, teachers' absence; Offense against teachers, contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.