लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सध्या खरिपाची पेरणी सुरू झाली आहे; परंतु शेतकर्‍यांना बँकांमार्फत कृषी कर्ज वाटप सुरू केले नाही, तसेच शासनाने केलेल्या कर्जमाफी निर्णयातील निकष, बँकांनी सुरू न केलेले कृषी कर्ज वाटपामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी तातडीने कृषी विभाग, सहकार विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि त्यांना सोमवारपासून थकबाकीदार शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. राज्यात शेतकर्‍यांना दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणारा अकोला पहिला जिल्हा ठरणार आहे.
शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतर त्यासाठी शासनाने लावलेल्या निकषांमुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यासाठी शेतकर्‍यांना शासनाने थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने १0 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी तातडीने कृषी विभाग, सहकार विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी जिल्हय़ातील कर्ज वाटपाची स्थिती, थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या, त्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करण्याबाबतची तयारी याचा आढावा घेतला आणि शेतकर्‍यांना सोमवारपासून तातडीने दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. जिल्हय़ात अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली; परंतु हजारो शेतकरी कृषी कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांकडे पैसा नाही. ११ जून रोजी राज्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली; मात्र ही कर्जमाफी काही निकषांच्या अधीन राहून करण्यात आल्याने शेतकर्‍यांना नव्याने कर्ज वाटपासाठी मोठा विलंब लागणार होता. तोंडावर आलेली खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेता शेतकर्‍यांना बी-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यासाठी ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार प्रत्येक शेतकर्‍याला १0 हजार रुपये शासन हमीवर तातडीने कर्ज देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतकर्‍यांना कर्ज वाटप व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला आणि त्यासंबंधीचे अधिकार्‍यांना निर्देश दिले. बैठकीला जिल्हा उपनिबंधक के.जी. मावळे, खाडे, जिल्हा बँकेचे अनंत वैद्य, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.