आघाडीसाठी ‘स्वाभिमानी’चा दोन्ही तबल्यावर हात; काँग्रेसला दिला प्रस्ताव ; भारिप सोबतही चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:49 PM2018-09-30T12:49:38+5:302018-09-30T13:52:10+5:30

स्वाभिमानीचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी आता भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा करणार असल्याने स्वाभिमानीने आघाडीसाठी सध्या तरी दोन्ही तबल्यावर हात ठेवला आहे.

'Swabhimani's Hands on both sides; Proposal to Congress; Discussion with Bharipesh | आघाडीसाठी ‘स्वाभिमानी’चा दोन्ही तबल्यावर हात; काँग्रेसला दिला प्रस्ताव ; भारिप सोबतही चर्चा

आघाडीसाठी ‘स्वाभिमानी’चा दोन्ही तबल्यावर हात; काँग्रेसला दिला प्रस्ताव ; भारिप सोबतही चर्चा

Next
ठळक मुद्देस्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी अ‍ॅड.आंबेडकरांची भेट घेऊन राजु शेटटीच यांचा मनसुबा त्यांचा कानी घातला. कुठल्याही जातीपातीचे व धर्माचे राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न हाच या संघटेनचा अजेंडा राहिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, भारिपचे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सहभागी झाले तरच बळ वाढणार आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यापूर्वीच बिगुल फुंकला आहे. महायुतीमध्ये मधून बाहेर पडल्यानंतर आता स्वाभिमानीला संभाव्य महाआघाडीत सहभागी व्हायचे असून काँग्रेस-राष्टÑवादीसोबत अनौपचारीक चर्चाही झाली आहे. काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच स्वाभिमानीचे राष्टÑीय अध्यक्ष खा.राजु शेट्टी आता भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा करणार असल्याने स्वाभिमानीने आघाडीसाठी सध्या तरी दोन्ही तबल्यावर हात ठेवला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटेनेने राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून, हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांवरचा दावा प्रबळ ठेवणार आहेत. त्याच अनुषंगाने गेल्या महिन्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत स्वाभिमानीची अनौपचारीक चर्चा सुरू आहेत. हातकणंगले जागा जिंकुन स्वाभिमानीने आपली ताकद अधोरेख्ीात केली होती. तर माढा मतदारसंघात स्वाभिमानीचे त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टक्कर देत मोहिते पाटलांचा गड हादरवला होता मात्र अवघ्या २५ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. या दोन मतदारसंघांसह सबोध मोहितेंसाठी वर्धा व रविकांत तुपकरांसाठी बुलडाणा या चार मतदारसंघासाठी स्वाभिमानी प्रचंड आशावादी आहे. काँग्रेस आघाडी सोबत स्वाभिमानीचे गणीत जुळले तर स्वाभिमानीला ते हवेच आहे मात्र तसे न झाल्यास विदर्भात अ‍ॅड.आंबेडकरांच्या ताकदीची बेरीज करून नवी समिकरणे मांडायची आहेत. त्यादृष्टीनेच स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी अ‍ॅड.आंबेडकरांची भेट घेऊन राजु शेटटीच यांचा मनसुबा त्यांचा कानी घातला. येत्या ६ आॅक्टोबर रोजी खासदार राजू शेट्टी व अ‍ॅड.आंबेडकर यांची मुंबईत चर्चा होणार असून त्यानंतरच या नव्या समिकरणांचे भविष्य ठरणार आहे.

स्वाभिमानीला एमआयएम चालणार आहे का?

शेतकरी, शेतमजुर व कामगार हा स्वाभिमानी शेतकरी संघटेनचा मुळ आधार आहे. कुठल्याही जातीपातीचे व धर्माचे राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न हाच या संघटेनचा अजेंडा राहिला आहे. त्यामुळे उद्या अ‍ॅड.आंबेडकरांसोबत आघाडी करण्याची वेळ आली अन् आंबेडकरांनी एमआयएमसह आघाडी करा असा आग्रह धरला तर स्वाभिमानीला ‘एमआयएम’ची साथ चालणार आहे का? हा प्रश्नच आहे. या संदर्भात स्वाभिमानीचे नेते सध्या काहीच भाष्य करायला तयार नाहीत हे विशेष !

महाआघडीत सहभागासाठीही होऊ शकते चर्चा
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडीचे सुतोवाच करताच त्यांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. जागा वाटपाबाबत सकारात्मक विचार केला जाईल. मात्र, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे असे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीच्या समन्वय समितीच्या माध्यमातून विविध पक्ष नेत्यांशी आघाडीचे नेते चर्चा करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, भारिपचे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सहभागी झाले तरच बळ वाढणार आहे. स्वाभिमानीसाठी राष्टÑवादी काँग्र्रेस माढा व बुलडाणा हे दोन मतदारसंघ सोडण्याची शक्यता असल्याने आंबेडकरांनी महाआघाडीत यावे असा प्रयत्न खा.शेटटी करण्याची शक्यता आहे.

 

Web Title: 'Swabhimani's Hands on both sides; Proposal to Congress; Discussion with Bharipesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.