भाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:50 PM2019-07-09T13:50:06+5:302019-07-09T14:16:17+5:30

येत्या निवडणुकीत भाजपाने वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसमोर या मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे.

To stop BJP, challenge before congress and vanchit bahujan aaghadi | भाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान!

भाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान!

Next

- राजेश शेगोकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावातही अकोला पूर्व या मतदारसंघात भाजपाचा अवघ्या २ हजार ४४० मतांनी विजय झाला होता. या निसटत्या विजयानंतर भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी या मतदारसंघाची मजबूत बांधणी केली व भाजपाचा जनाधार मजबूत केल्याचे चित्र त्यानंतरच्या कालावधीत समोर आले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाने वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसमोर या मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी सुरू असून, वंचित बहुजन आघाडीची बदलती समीकरणे लक्षात घेता या पक्षामध्ये दावेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी निवडणूक रंगतदार ठरेल.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भारिप-बमसंचे हरिदास भदे यांनी या मतदारसंघात मिळविलेला विजय २०१४ मध्ये कायम ठेवता आला नाही. भाजपाचे रणधीर सावरकर यांनी भदे यांच्यावर विजय मिळवित भगवा फडकविला. या विजयानंतर आ. सावरकर यांनी मतदारसंघात भाजपा मजबूत केल्यामुळेच अकोला शहराच्या हद्दवाढीमध्ये सहभागी झालेल्या प्रभागांमध्ये महापािलकेच्या निवडणुकीत कमळ फुलले. या यशाचे श्रेय साहजिकच आ. सावरकर यांना जात असल्याने त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे साहजिकच पक्षातूनही त्यांच्या उमेदवारीला स्पर्धक निर्माण झालेला नाही. भाजपाने निर्माण केलेले हेच आव्हान मोडून काढण्यासाठी सर्वच विरोधकांना मोठी कसरत करावी लागेल असेच चित्र सध्या आहे.
शिवसेनेलाही हवा मतदारसंघ
बोरगाव मंजू हा मतदारसंघ असल्यापासून या मतदारसंघातून युतीमध्ये शिवसेनेनेच लढत दिली आहे. २०१४ मध्ये सेना-भाजपा स्वतंत्र लढल्यावर या मतदारसंघात भाजपाने विजय मिळविला, त्यामुळे आता शिवसेनेचा या मतदारसंघावरील दावा संपला असल्याचे मानले जात आहे; मात्र राजकारणात काहीही होऊ शकते या विधानावर विश्वास असल्याने युतीमध्ये शिवसेना पाचपैकी दोन मतदारसंघावर दावा कायम ठेवून आहे. त्यामध्ये अकोला पूर्वचाही पर्याय खुला आहे. शिवसेनेत आमदार गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंगदादा पिंजरकर, गोपाल दातकर, अ‍ॅड. अनिल काळे, ज्योत्स्ना चोरे, मुकेश मुरमकार असे अनेक दावेदार आहेत.


‘वंचित’मध्ये वाढले दावेदार

अकोला पूर्व या मतदारसंघाच्या निर्मितीपूर्वी हा मतदारसंघ बोरगाव मंजू या नावाने होता. त्यावेळी १९९९, २००४ मध्ये व अकोला पूर्वच्या निर्मितीनंतर २००९ मध्ये अशा तिन्ही निवडणुकांमध्ये भारिप-बमसंने विजय मिळवून या मतदारसंघाला ‘गड’ निर्माण केला होता. २०१४ मध्ये अवघ्या २ हजारावर मतांनी हा गड पडला, त्यामुळे येथील जनाधार लक्षात घेता भारिप-बमसंचे नवे स्वरूप असलेल्या वंचित आघाडीकडे उमेदवारीसाठी दावेदार वाढले आहेत. माजी.आ. हरिदास भदे, जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी मंत्री डॉ.डी.एम.भांडे, बालमुकुंद भिरड, दामोदर जगताप, ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे अशी मोठी स्पर्धा आहे. 


काँग्रेस, राष्टÑवादीत इच्छुकांना वेध 
आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. २०१४ मध्ये येथे राष्टÑवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले होते. यावेळी काँग्रेसला अवघी ५.६६ तर राष्टÑवादीला ३.६१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेससमोर आता भाजपासह वंचितचे आव्हान आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून दादाराव मते पाटील, डॉ. सुभाष कोरपे, अजाबराव ताले, पुरुषोत्तम दातकर आदी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर तांत्रिक कारणांमुळे लोकसभेची उमेदवारी हुकलेले डॉ. अभय पाटील हेसुद्धा या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार होऊ शकतात, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे राष्टÑवादी काँग्रेसही या मतदारसंघात चाचपणी करत असून, हा मतदारसंघ मिळालाच तर राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह शिरीश धोत्रे, श्रीकांत पिसे यांची नावे चर्चेत आहेत. 

 

Web Title: To stop BJP, challenge before congress and vanchit bahujan aaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.