State Bank of Telhara; The sick couple returned without sending money | आजारी दाम्पत्याला पैसे न देताच पाठविले परत;  तेल्हारा स्टेट बँकेचा प्रताप

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे येथील विलास माधवराव अवताडे यांचे त्यांच्या पत्नीच्या नावासह स्टेट बँक शाखा तेल्हारा येथे बचत ठेव खाते आहे. २३ हजार रुपये जमा असलेल्या बचत ठेव खात्यातील २० हजार रुपयांचा विड्रॉल त्यांनी बँकेकडे सुपूर्द केला. आधार कार्डावरील जन्मतारीख ही तारीख व महिन्यासह नसल्यामुळे दोघांचेही केवळ जन्मतारखेचे वर्ष असल्यामुळे बँकेने पैसे देण्यास नकार दिला.


तेल्हारा : एकीकडे शासन नागरिकांना मूलभूत सुविधा त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याकरिता निरनिराळ्या योजना राबविते. या योजना राबवण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी सहानुभूतीपूर्वक वागणूक देत नसल्याचा अनुभव स्टेट बँकेच्या तेल्हारा शाखेत एका दाम्पत्याला आला.
तेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे येथील विलास माधवराव अवताडे यांचे त्यांच्या पत्नीच्या नावासह स्टेट बँक शाखा तेल्हारा येथे बचत ठेव खाते आहे. २९ डिसेंबर रोजी ते पत्नीसह स्टेट बँकेत पैसे काढण्याकरिता गेले. २३ हजार रुपये जमा असलेल्या बचत ठेव खात्यातील २० हजार रुपयांचा विड्रॉल त्यांनी बँकेकडे सुपूर्द केला. मात्र, केवायसी पूर्ण नसल्याचे कारण पुढे करून, त्यांचा विड्रॉल रद्द करण्यात आला. तेव्हा संबंधित खातेदाराने लगेच केवायसी फॉर्म भरून त्याला आधार कार्ड लावून नियमावलीची पूर्तताही केली. मात्र, आधार कार्डावरील जन्मतारीख ही तारीख व महिन्यासह नसल्यामुळे दोघांचेही केवळ जन्मतारखेचे वर्ष असल्यामुळे बँकेने पैसे देण्यास नकार दिला. जोपर्यंत आधार कार्डावर जन्म तारखेची तारीख व महिन्याचा उल्लेख येणार नाही, तोपर्यंत पैसे मिळणार नसल्याची तंबी बँकेने दिल्यामुळे आजारी दाम्पत्याला रिकामे हाताने घरी परतावे लागले. उसनवारीने घेतलेल्या पैशाची परतफेड करण्याकरिता घरातील ४ क्विं. ६० किलो कापूस गावातील व्यापाºयाला विकून दिलेला शब्द पूर्ण केला. आधार कार्डावर तारीख व महिना अपडेट करण्याकरिता एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत दैनंदिन गरजा भागविण्याकरिता पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याचे संबंधित खातेदाराने व्यक्त केले. (प्रतिनिधी)
गरज पडेल तेव्हाच खातेदार बँकेत येत असतात. त्यामुळे नवीन नियमांची माहिती त्यांना लवकर मिळत नाही. संबंधित खातेदाराने शाळेच्या टीसीवरील जन्मतारखेवरील तारीख व महिना दाखवून आपली गैरसोय दूर करावी.
- द. वि. निनावकर
शाखाधिकारी, स्टेट बँक, तेल्हारा.