ठळक मुद्दे १२ हजार लीटर स्पिरिट सीलउत्पादन शुल्क विभागाची मूर्तिजापूरनजीक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : छत्तीसगढ येथून निघालेला आणि गोवा येथे जात असलेला रेक्टीफाइड आरएस नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेला स्पिरिटचा ट्रक बुधवारी दुपारी पकडण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील भरारी पथक व अकोला उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तिकरीत्या मूर्तिजापूरनजीकच्या एका ढाब्यावर ही कारवाई करण्यात आली. १२ हजार लीटर स्पिरिट जप्त करण्यात आले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
छत्तीसगढ येथील केए 0१ बी ६२८१ क्रमांकाचा रेक्टीफाइड स्पिरिटचा एक टँकर तब्बल १२ हजार लीटर स्पिरिट घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्क विभागाच्या डॉ. अश्‍विनी जोशी, सुनील चव्हाण व राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने मूर्तिजापूर ते अकोला या दरम्यान पाळत ठेवली, सदर स्पिरिट घेऊन जाणारा ट्रक मूर्तिजापूरजवळील एका ढाब्यावर असल्याची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ट्रक जप्त केला. या ट्रकमधील १२ हजार लीटर स्पिरिट जप्त करण्यात आले असून, सदर स्पिरिटची किंमत तब्बल १५ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. 
या ट्रकचा चालक पिन्नर पेरुमल तेलवन आणि क्लिनर सत्तार अब्दुल रहिम या दोघांना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी या दोघांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही तामीळ असल्याने त्यांना हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषा कळत नव्हती. या भाषेच्या अडचणीमुळे उत्पादन शुल्क विभागाला अधिक माहिती मिळाली नाही. दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. भाषेची अडचण आल्याने सदर ट्रक कुणाच्या मालकीचा आहे, स्पिरिट कुणाचे आहे, हे समोर आले नाही. उत्पादन शुल्क विभागाने तामीळ भाषा समजणारा आणि त्याचे मराठी किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणार्‍यांचा शोध सुरू केला आहे. या दोघांची तामीळ भाषेत चौकशी केल्यानंतर सदर प्रकरणाचा भंडाफोड होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

यापूर्वी पकडले होते स्पिरिट!
पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी २0१४ मध्ये स्पिरिटचा ट्रक पकडला होता. यामध्ये अकोल्यातील बड्या दारू माफियांचा सहभाग असल्याचेही समोर आले होते; मात्र त्यानंतर सर्वच स्तरावर हे प्रकरण ‘मॅनेज’ करण्यात आले होते. यासंदर्भात चांगलीच चर्चा झाली; मात्र ठोस कारवाई झाली नव्हती, हे विशेष.

चालक, क्लिनर तामीळ भाषी
 चालक पिन्नर पेरुमल तेलवन आणि क्लीनर सत्तार अब्दुल रहीम या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही तामीळ भाषिक असल्यामुळे सदर स्पिरिटचा मालक समोर आला नाही. उत्पादन शुल्क विभागाला या प्रकरणात अधिक माहिती मिळाली नसल्याचे वास्तव आहे. तामिळ भाषेचा ट्रान्सलेट करणार्‍या व्यक्तीचा शोध घेऊन या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत.

टँकरमध्ये विविध कप्पे
सदर स्पिरिटच्या टँकरमध्ये आतून विविध कप्पे तयार करण्यात आले होते. बाहेरील कप्प्यांमध्ये खाद्य तेल होते, तर आतील कप्प्यामध्ये स्पिरिट ठेवण्यात आले होते. चोरीच्या मार्गाने स्पिरिटच्या टॅँकरची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघड झाले असून, त्या दिशेने पोलिसांनी व उत्पादन शुल्क विभागाने तपास करण्याची गरज आहे.

१५ लाखांचे ८0 लाख
१५ लाखांच्या स्पिरिटमध्ये तब्बल ८0 लाख रुपयांची दारू बनविण्यात येत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. यावरून दारू माफियांनी रेक्टिफाइड स्पिरिटच्या माध्यमातून मोठा गोरखधंदाच उघडला असून, अवैधरीत्या सुरू असलेल्या या धंद्यावर पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्याची गरज आहे.

दारू माफियांवर संशय
यामध्ये अकोल्यातील दारू माफियांचाही सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. गोव्याकडे जाणारा ट्रक मंगळवारपासून मूर्तिजापूर परिसरात बुधवारपर्यंत होता. यावरून यामध्ये अकोल्यातील दारू माफियांचे हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सदर स्पिरिट हे अकोल्यातील दारू माफियांसाठी आणल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

१00 किमीनंतर चालकाची बदली
४सदर स्पिरिटचा ट्रक छत्तीसगढवरून गोवा येथे नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दर १00 किलोमीटरनंतर या ट्रकचा चालक बदलण्यात येत होता. यावरून हे सर्व मोठे गौडबंगाल असून, यामध्ये मोठय़ा टोळीचा हात असल्याचे बोलल्या जात आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.