पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच सप्टेंबरपासून बंद

By Atul.jaiswal | Published: January 19, 2019 12:19 PM2019-01-19T12:19:26+5:302019-01-19T12:20:27+5:30

अकोला: महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या (महानिर्मिती) बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २५० मेगावॉटचा क्र. तीनचा संच ‘जनरेटर’ची ‘स्टेटर वाइंडिंग’ जळाल्याने १५ सप्टेंबरपासून बंद पडला आहे.

A set of Paras Thermal Power Center has been closed since September | पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच सप्टेंबरपासून बंद

पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच सप्टेंबरपासून बंद

googlenewsNext


अकोला: महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या (महानिर्मिती) बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २५० मेगावॉटचा क्र. तीनचा संच ‘जनरेटर’ची ‘स्टेटर वाइंडिंग’ जळाल्याने १५ सप्टेंबरपासून बंद पडला आहे. संचाची दुरुस्ती करण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (भेल)चे तंत्रज्ञ पारसमध्ये दाखल झाले असून, येत्या आठवडाभरात हा संच सुरू होणे अपेक्षित आहे. दरम्यान, हा संच वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला असून, दुसरा संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याने त्याचा वीज निर्मितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रकल्पातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रात २५०-२५० मेगावॉटचे असे दोन वीज निर्मिती संच आहेत. पूर्वीचे एक व दोन क्रमांकाचे संच बंद करण्यात येऊन, त्या जागी तीन व चार क्रमांकाचे दोन नवीन वीज निर्मिती संच या प्रकल्पात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू असताना, संच क्र. तीन हा जनरेटरमधील स्टेटर वाइंडिंग जळाल्याने गत १५ सप्टेंबरपासून बंद पडला. दरम्यान, वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी संच बंद ठेवण्याची वेळापत्रकानुसारची वेळ जवळ असल्याने तेव्हापासून हा संच बंदच ठेवण्यात आला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात देखभाल दुरुस्तीचे ‘शेड्युल’ घेण्यात आले. देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना जनरेटरमधील स्टेटर वाइंडिंग जळाल्याचे लक्षात आल्यानंतर दुरुस्तीसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या सरकारी कंपनीचे तंत्रज्ञ व प्रकल्पातील अभियंत्यांनी युद्धपातळीवर हे काम हाती घेऊन स्टेटर वाइंडिंग दुरुस्त केली. नियमित देखभाल दुरुस्तीचेही काम पूर्णत्वास आले असून, लवकरच हा संच सुरू होण्याची शक्यता आहे.

‘बेअरिंग व्हायब्रेशन’च्या दुरुस्तीचे काम बाकी
स्टेटर वाइंडिंग दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले, तरी जनरेटरच्या बेअरिंगमध्ये होत असलेल्या व्हायब्रेशनच्या दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. लवकरच हा दोष दूर होऊन येत्या आठवडाभरात हा संच सुरू होण्याची शक्यता आहे.

दुसरा संच पूर्ण क्षमतेने सुरू
संच क्रमांक तीन हा देखभाल दुरुस्तीसाठी गत चार महिन्यांपासून बंद असला, तरी संच क्र. चार हा सुरू असल्याने त्याचा वीज निर्मितीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या विजेची मागणी कमी असल्यामुळे या संचातूनही पूर्ण क्षमतेची वीज उत्पादित केली जात नाही. २५० मेगावॉट क्षमता असलेल्या या संचातून १९० ते २०० मेगावॉट एवढीच वीज निर्मिती केली जात असल्याचे मुख्य अभियंता रवींद्र गोहणे यांनी सांगितले.
 

संच क्र. तीन हा स्टेटर वाइंडिंग जळाल्यामुळे व देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, आठवडाभरात हा संच सुरू होईल.
- रवींद्र गोहणे, मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, पारस.

 

Web Title: A set of Paras Thermal Power Center has been closed since September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.