बालकांना ‘रोटा व्हायरस’चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:23 PM2019-07-22T12:23:06+5:302019-07-22T12:26:50+5:30

बालकांमधील ‘रोटा व्हायरस’चा हा धोका टाळण्यासाठी राज्यभरात रोटा व्हायरसची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

Rota Virus risk to children! | बालकांना ‘रोटा व्हायरस’चा धोका!

बालकांना ‘रोटा व्हायरस’चा धोका!

googlenewsNext

अकोला : पावसाळ्यात डायरिया, डेंग्यूसोबतच अतिसाराचीही समस्या गंभीर आहे. विशेष म्हणजे, ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये अतिसाराची समस्या गंभीर असून, त्यातील बहुतांश रुग्ण रोटा व्हायरसने ग्रस्त असतात. बालकांमधील ‘रोटा व्हायरस’चा हा धोका टाळण्यासाठी राज्यभरात रोटा व्हायरसची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाळा आला की अस्वच्छता आणि दूषित पाणी यामुळे डायरिया, कावीळ, अतिसार तसेच पोटाशी निगडित विविध विकार उद््भवतात. डायरिया, अतिसाराचा संसर्ग वाढल्याने ० ते २ वर्षे वयोगटातील बहुतांश बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’चे लक्षणीय प्रमाण आढळून येते. अतिसारामुळे दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ४० टक्के बालके ही रोटा व्हायरसने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येते. यापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. शिवाय, अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात रोटा व्हायरस लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यांतर्गत २० लाखांपेक्षा जास्त बालकांना रोटा व्हायरस लस दिली जाणार आहे.

काय आहे ‘रोटा व्हायरस’...
‘रोटा व्हायरस’ हा अत्यंत संक्रमणजन्य विषाणू आहे. मुलांमधील अतिसाराचे सर्वात मोठे कारण ‘रोटा व्हायरस’ आहे. रोटा संसर्गाची सुरुवात सौम्य अतिसाराने होते व नंतर तो गंभीर रूप घेते. उपचार न मिळाल्यास शरीरातील पाणी व क्षार कमी होतात. पोटदुखी व उलटी होते. ज्यामुळे मुलांना रुग्णालयात भरती करावे लागू शकते, अन्यथा मुलाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

अकोल्यात लसीकरणाला आजपासून प्रारंभ
राज्यभरात राबविण्यात येणाºया या मोहिमेला अकोल्यात सोमवार, २२ जुलैपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. यांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रासह आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत लसीकरण करण्यात येणार आहे.

असा असेल लसीकरणाचा टप्पा
एक वर्षापर्यंतच्या बालकांना ‘रोटा व्हायरस’चे लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये वयाच्या सहा, दहा आणि चौदाव्या आठवड्यात अशी तीनदा ही लस दिली जाणार आहे, हे विशेष. आतापर्यंत ही लस खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिली जात होती; मात्र ‘रोटा व्हायरस’ची लस आता शासकीय आरोग्य केंद्रातून मोफत दिली जाणार आहे.

अशी आहे मोहिमेची तयारी
या मोहिमेंतर्गत राज्यात ४ लाख ४० हजार लसींचे डोस तसेच त्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आलेत. मोहिमेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सुमारे १ लाख ८६ हजार अधिकारी, कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राज्यभरात ‘रोटा व्हायरस’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार येत आहे. अकोल्यात या मोहिमेला सोमवार, २२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पालकांनी १ वर्षापर्यंतच्या बालकांना लस देण्यास पुढाकार घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: Rota Virus risk to children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.