रस्त्यांवरील अतिरिक्त पथदिवे हटविणार - महापौरांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:30 PM2019-05-19T16:30:10+5:302019-05-19T16:30:18+5:30

लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी संपूर्ण शहरात उभारण्यात आलेले अतिरिक्त पथदिवे हटविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत.

 Removing additional streetlights on roads - Mayor's directions | रस्त्यांवरील अतिरिक्त पथदिवे हटविणार - महापौरांचे निर्देश 

रस्त्यांवरील अतिरिक्त पथदिवे हटविणार - महापौरांचे निर्देश 

Next

अकोला: शहरात अवघ्या पंधरा ते वीस फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारल्या जात असल्यामुळे ही अनावश्यक उधळपट्टी कशासाठी, यासंदर्भात लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी संपूर्ण शहरात उभारण्यात आलेले अतिरिक्त पथदिवे हटविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुषंगाने अतिरिक्त पथदिवे हटविण्यासोबतच विविध तक्रारींचे तातडीने निरसन करण्यासाठी लवकरच आउटसोर्सिंगमार्फत २२ लाइनमनची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे.
महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरात सर्वत्र एलईडी लाइट उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे दिसून येते. आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त १० कोटी व त्यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून जमा केलेले १० कोटी असे एकूण २० कोटी रुपयांतून रॉयल इलेक्ट्रानिक पुणे, यांच्यावतीने शहरातील ११० मुख्य रस्ते व ५५ मुख्य चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारण्यात आले. त्यापाठोपाठ राज्य शासनाने एलईडी लाईटसाठी ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. मनपाने ‘ईईएसएल’ कंपनीसोबत १९ कोटी ९० लक्ष रुपयांचा करार केला असून, यामध्ये लाइट उभारणीसाठी १३ कोटी ९० लक्ष रुपये व देखभाल दुरुस्तीपोटी ६ कोटी रुपये चौदाव्या वित्त आयोगातून अदा केले जाणार आहेत. एकूणच, आजरोजी शहरात ४० कोटीतून एलईडी लाइट उभारल्या जात असताना अनावश्यक ठिकाणी लाइट लावल्या जात असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा उरफाटा प्रकार होत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये उमटल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

२२ लाइनमनची होणार नियुक्ती
शहरात सुमारे २६ हजारपेक्षा जास्त एलईडी लाइटमुळे झगमगाट होणार असला तरी वेळोवेळी निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तसेच अतिरिक्त पथदिवे काढून घेण्यासाठी आउटसोर्सिंगमार्फत २२ लाइनमनची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. संबंधित कर्मचारी मनपाच्या नियंत्रणाखाली कामकाज करतील.


ज्या भागात रॉयल कंपनीने एलईडी लाईट लावले त्याच परिसरात ईईएसएलमार्फत पथदिवे लावल्या जात आहेत. अनावश्यक लाइटमुळे वीज देयकांत वाढ होईल. त्यामुळे असे पथदिवे काढून घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, लोकमतचे आभारी आहोत.
- विजय अग्रवाल, महापौर


शहरातील अनेक खांबांवर एलईडी लाइट लावल्या जात असताना त्याच परिसरात जुने सीएफएल पथदिवे कायम आहेत. गरज नसताना १० ते १५ फूट अंतरावर उभारल्या जाणारे पथदिवे हटवावे लागतील. अन्यथा मनपावर अतिरिक्त वीज देयकाचा ताण येईल, हे नक्की.
- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

 

Web Title:  Removing additional streetlights on roads - Mayor's directions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.