भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:43 AM2018-02-19T02:43:45+5:302018-02-19T02:52:37+5:30

अकोला : विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी बाश्रीटाकळी येथे केला.

Questions of the farmers increased during the BJP government's tenure - Ashok Chavan | भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण 

भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण 

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा आरोपबाबासाहेब धाबेकर वाढदिवस थाटात 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी बाश्रीटाकळी येथे केला.
बाश्रीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या वाढदिवस समारंभात ते बोलत होते. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील, सत्कारमूर्ती बाबासाहेब धाबेकर, माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ.गोवर्धन शर्मा, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, आ. श्रीकांत देशपांडे,  आ.राजेंद्र पाटणी, आ.अब्दुल सत्तार, आ.अमित झनक, आ. शिवाजीराव नाईक, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, रामदास बोडखे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोषकुमार कोरपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, रमेश हिंगणकर, सुनील धाबेकर आदी उपस्थित होते. 
काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (आमच्या) सरकारच्या तुलनेत विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न वाढल्याचा आरोप खा. अशोक चव्हाण यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना उद्देशून केला. राज्यात  शेतकरी आत्महत्या, बोंडअळी प्रादुर्भावाने कापसाचे झालेले नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत, शेतकर्‍यांचे प्रश्न सुटले पाहिजे, शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी काम करण्याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. बाबासाहेब धाबेकर यांनी ग्रामीण भागाशी, मातीशी आणि सर्वसामान्य माणसासोबतची नाळ सोडली नाही. काम करण्याची हातोटी, शिस्त आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख असून, राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र मनभेद नसले पाहिजे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब धाबेकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा राजकीय जीवनातील प्रवास आहे, अशा  शब्दात खा. चव्हाण यांनी बाबासाहेब धाबेकर यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  खा. संजय धोत्रे, श्रीकांत देशपांडे, पांडुरंग फुंडकर, आ. शिवाजीराव नाईक यांचीही भाषणे झालीत. त्यांनी बाबासाहेब धाबेकर यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी खा.अशोक चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब धाबेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली गालट यांनी, संचालन सुप्रसिद्ध वर्‍हाडी कवी अँड.अनंत खेळकर यांनी, तर आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी मानले.

वैचारिक मतभेद होते; पण मनभेद नाही - ना. पांडुरंग फुंडकर 
राजकीय जीवनात माझे बाबासाहेब धाबेकर यांच्यासोबत वैचारिक मतभेद होते; पण मनभेद कधीच झाले नाही, असे कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. पक्ष बाजूला ठेवून निवडणुकांमध्ये बाबासाहेब धाबेकर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो, असे सांगत राजकारणातील मोठय़ा मनाचा आणि दिलदार नेता असल्याचेही फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

बाबासाहेब धाबेकर राजकारणातला ‘एव्हर ग्रीन हीरो’!
बाबासाहेब धाबेकर राजकारणातला एक ‘दिलखुलास’ माणूस आणि ‘एव्हर ग्रीन हीरो’ असं नेतृत्व आहे, अशा शब्दात खा. अशोक चव्हाण यांनी धाबेकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या अनुभव आणि कार्याचा आम्हाला लाभ होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. 
धाबेकर यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांच्याबद्दल निर्माण झालेले मतभेद कमी करण्याचे काम माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. तसेच दिवंगत विलासराव देशमुख व माझ्यातील मतभेद कमी करण्याचे कामदेखील हर्षवर्धन पाटील यांनी केले होते, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Questions of the farmers increased during the BJP government's tenure - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.