शिक्षकांवर दबाव; शाळा व्यवस्थापन समितीला झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:35 PM2018-04-25T13:35:05+5:302018-04-25T13:35:05+5:30

अकोला : शाळा व्यवस्थापन समितीच्या जाचाला कंटाळलेल्या मनपा उर्दू शाळा क्रमांक नऊमधील सर्व चौदा शिक्षकांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली.

Pressure on teachers; fevour on School Management Committee | शिक्षकांवर दबाव; शाळा व्यवस्थापन समितीला झुकते माप

शिक्षकांवर दबाव; शाळा व्यवस्थापन समितीला झुकते माप

Next
ठळक मुद्देव्यवस्थापन समिती व काही नगरसेवकांनी संगनमताने शाळेतील शिक्षकांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक कामात हस्तक्षेप करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सर्व नियम, निकष बाजूला सारून शिक्षकांवर मनमानी कारभार करण्यासाठी दमदाटी केली जात आहे.


अकोला : शाळा व्यवस्थापन समितीच्या जाचाला कंटाळलेल्या मनपा उर्दू शाळा क्रमांक नऊमधील सर्व चौदा शिक्षकांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त वाघ यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना दिला होता. चौकशीदरम्यान चक्क शिक्षकांवरच दबावतंत्राचा वापर करण्यात आला असून, शाळा व्यवस्थापन समितीला झुकते माप देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जातीने लक्ष देऊन ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
खदान परिसरातील उर्दू मुलांची शाळा क्रमांक नऊमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व काही नगरसेवकांनी संगनमताने शाळेतील शिक्षकांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेत दररोज येऊन शिक्षकांच्या शैक्षणिक कामात हस्तक्षेप करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सर्व नियम, निकष बाजूला सारून शिक्षकांवर मनमानी कारभार करण्यासाठी दमदाटी केली जात आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार कामकाज न केल्यास शिक्षकांना त्यांची बदली करण्याचे धमकीवजा इशारे दिले जात असल्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या शाळेतील सर्व १४ शिक्षकांनी शाळेमध्ये सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या कारभाराला वैतागलेल्या शिक्षकांनी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे धाव घेऊन तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त वाघ यांनी शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. चौकशीदरम्यान शाळेतील सर्व शिक्षकांवर अप्रत्यक्ष दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.

शाळेचा मनमानी वापर करण्यासाठी खटाटोप
उन्हाळ्याच्या दिवसांत उर्दू शाळा क्रमांक नऊमध्ये परिसरातील असंख्य नागरिक लग्नकार्य साजरे करतात. या बदल्यात मनपाच्या नावाखाली शाळा व्यवस्थापन समितीकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्या जात असल्याची माहिती आहे. शाळेची इमारत व परिसराचा मनमानीरीत्या वापर करून त्या बदल्यात आर्थिक कमाई करण्याच्या उद्देशातूनच प्रामाणिक शिक्षकांसोबत नाहक वाद निर्माण करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा आहे.

शिक्षणाधिकारी पुन्हा रजेवर!
मनपाच्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मनपात प्रदीर्घ रजेनंतर पाऊल ठेवले होते. त्यावेळी उर्दू शिक्षकांच्या प्रकरणात आयुक्त जितेंद्र वाघ यांनी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यापूर्वीच शिक्षणाधिकारी सुलताना यांनी उर्दू शाळेत जाऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी अहवाल तयार केला, त्यानंतर पुन्हा शिक्षणाधिकारी रजेवर गेल्या आहेत. असे असले, तरी उर्दू शाळा क्र. नऊमधील काही शिक्षकांवर तक्रार मागे घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Pressure on teachers; fevour on School Management Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.