प्रकाश आंबेडकरांचे दबावतंत्र; लोकसभेचा उमेदवार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:29 AM2018-12-29T05:29:07+5:302018-12-29T12:59:37+5:30

भारिप-बमंसच्या एमआयएमसोबतच्या मैत्रीमुळे काँग्रेससोबत महाआघाडीची शक्यता संपली असल्यावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी शेगावात शिक्कामोर्तबच केले.

 Prakash Ambedkar's control; Lok Sabha election declared | प्रकाश आंबेडकरांचे दबावतंत्र; लोकसभेचा उमेदवार घोषित

प्रकाश आंबेडकरांचे दबावतंत्र; लोकसभेचा उमेदवार घोषित

Next

- राजेश शेगोकार

अकोला: जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा राजकीय प्रयोग करणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमंसच्या एमआयएमसोबतच्या मैत्रीमुळे काँग्रेससोबत महाआघाडीची शक्यता संपली असल्याचे शिक्कामोर्तबच त्यांनी शुक्रवारी शेगावात केले. वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषदेत त्यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांना घोषित करून माळी, मुस्लीम, दलित व वंचित बहुजन अशा व्होट बँकेला कॅश करण्यासाठी पाऊल उचललेले आहे. हे पाऊल आंबेडकरांचे काँग्रेस आघाडीसाठी दबावतंत्र असून, लोकसभेसोबतच विधानसभेचेही गणिते मांडण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 
 धनगर, ओबीसी, मुस्लीम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला बारा जागा देईल, त्यांच्याशी आघाडी केली जाईल, असा प्रस्ताव अ‍ॅड. आंबेडकरांनी काँग्रेसला दिला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्याआधीच त्यांनी एमआयएमसोबत मैत्री जाहीर केल्यामुळे आंबेडकरांचा महाआघाडीतील प्रवेशाला अडथळा आला. दरम्यानच्या काळात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मित्र पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचे ठरविले असल्याची माहिती समोर आल्याने महाआघाडीत बिघाडीचे संकेत स्पष्ट झाले होते. अ‍ॅड. आंबेडकरांनी शुक्रवारी शेगावात बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी थेट उमेदवारच जाहीर केल्याने आता महाआघाडीचा विषयच संपला आहे. त्यामुळे येणाºया निवडणुकीत भारिप-बमसं, दलित, मुस्लीम यांच्यासह वंचित बहुजन आघाडीतील विविध समाजघटकांच्या बेरजेचे राजकारण करणार, हे स्पष्टच झाले आहे. पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ या तीन लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात माळी समाजाचे प्राबल्य आहे. विदर्भातील २५ विधानसभा व ५ लोकसभा मतदारसंघात ‘माळी समाज’ निर्णायक आहे, त्यामुळेच लोकसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करताना आंबेडकरांनी जाणीवपूर्वक माळी समाज एल्गार परिषदेची निवड केली. सिरस्कार यांच्या नावाच्या घोषणेमुळे बुलडाण्यासह अकोल्यातील माळी समाज भारिप-बमसंच्या सोबत राहील, असा त्यांचा होरा आहे. सोबतच इतर वंचित बहुजन समाजालाही उमेदवारी देण्याबद्दल कटिबद्ध असल्याचे संकेतही त्यांनी दिले. या सर्व राजकारणाचे पडसाद प्रत्यक्षात कसे उमटतात, यावरच आंबेडकरांच्या खेळीचे यशापयश ठरणार आहे.

अकोल्यासाठी बहुजन मतांच्या केंद्रीकरणाची खेळी 
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या गेल्या तीन निवडणुकींचा मागोवा घेतला तर अ‍ॅड. आंबेडकरांना मिळालेली मते ही चढत्या क्रमाने आहेत, तर काँगे्रसच्या मतांमध्ये विभाजन झाल्याचे दिसत आहे. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने माळी लक्ष्मणराव तायडे यांना उमेदवारी दिल्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांना मिळणाºया ओबीसी मतांमध्ये घट झाली. काँग्रेसची परंपरागत मते, मुस्लीम मतांचा जनाधार अन् ओबीसी विशेषत: माळी समाजाच्या मतांचे केंद्रीकरण या बळावर काँग्रेस क्रमांक दोनवर पोहचली व अ‍ॅड. आंबेडकर हे तिसºया क्रमांकावर राहिले. २०१४ मध्ये हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांकडे वळलेल्या मुस्लीम मतांना बे्रक बसला व काँग्रेसने दुसºया क्रमांकाची मते घेतली. या पृष्ठभूमीवर आता भारिप-एमआयएमची आघाडी ओबीसी मतांवरही प्रभाव टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


बाळापुरात मुस्लीम उमेदवाराला संधीची शक्यता 
बळीराम सिरस्कार यांना बुलडाण्यात लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे बाळापुरात विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही मुस्लीम समाजाला देऊन काँग्रेसच्या परंपरागत मतांमध्ये खिंडार पाडण्याचे मनसुबे भारिप-बमसंचे असल्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम या मतदारसंघात भारिपने लक्षणीय मते घेतली होती. हा मतदारसंघही मुस्लीमबहुल आहे, त्यामुळे यावेळी बाळापुरात मुस्लीम उमेदवाराचा प्रयोग केला जाऊ शकतो. 

Web Title:  Prakash Ambedkar's control; Lok Sabha election declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.