राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन; प्रबोधनाला लेखणीची जोड आवश्यक- ज्ञानेश्वर महाराज वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:59 PM2018-12-10T12:59:00+5:302018-12-10T12:59:35+5:30

राष्ट्रीय अखंडता, सामाजिक एकता टिकवण्यसाठी प्रबोधनकाराची वाणी आणि त्याला पत्रकारांच्या लेखणीची जोड मिळाल्यास बंधुत्वाचा नवसमाज घडेल, असे विचार ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.

Prabodhana requires a pair of stylus - Dnyaneshwar Maharaj Wagh | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन; प्रबोधनाला लेखणीची जोड आवश्यक- ज्ञानेश्वर महाराज वाघ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन; प्रबोधनाला लेखणीची जोड आवश्यक- ज्ञानेश्वर महाराज वाघ

Next

अकोला: समाजात वैर भावना वाढत असताना सामाजिक मने जोडण्याचे काम प्रबोधनकारांची वाणी, पुरोगामी संतांची विचारधारा करीत असते. यासोबतच राष्ट्रीय अखंडता, सामाजिक एकता टिकवण्यसाठी प्रबोधनकाराची वाणी आणि त्याला पत्रकारांच्या लेखणीची जोड मिळाल्यास बंधुत्वाचा नवसमाज घडेल, असे विचार ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी आयोजित सहाव्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ, कर्मयोग शिक्षण संस्था, कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय विचार मंचच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक विद्वान हे संत असतात; परंतु सर्वच विद्वान हे संत असू शकत नाहीत. संतांनी देव व माणसांना जागविण्याचे काम केले आहे. संत वाङ्मय अर्जित नसून, प्रासादिक आहे. शस्त्रक्रियेशिवाय हृदय परिवर्तन करण्याची शक्ती त्यात आहे. संत वाङ्मय मनोरंजन नव्हे, तर मनोमंथनासाठी आहे, असे सांगत अज्ञानी लोकांपेक्षा विश्वाच्या विद्वानांनी अधिक नुकसान केल्याचा दावा वाघ यांनी केला. यावेळी त्यांनी तुकडोजी महाराज हयात असताना सत्ता आणि सत्य एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून सत्ता आणि सत्य एकत्रित आल्यास विश्वाचा विकास शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रसंतांचे साहित्य विश्वव्यापी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पुरोगामी विचारांचे राष्ट्रसंत होते, असेही ते म्हणाले.
आज सकाळी या साहित्य संमेलनास ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व मामासाहेब दांडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद््घाटन सोहळ््याला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, प्राचार्य डॉ. मानेकर, स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम बुटे, संयोजक प्रा. किशोर बुटोले, सहसंयोजक प्रा. महेश मोडक, समीर थोडगे व्यासपीठावर उपस्थित होते. संमेलनास साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा प्रतिसाद लाभला. यावेळी उद््घाटक म्हणून अमरावती, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम बुटे, प्रमुख अतिथी म्हणून जनार्दनपंत बोथे यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी बाहेर पडणे गरजेचे - चांदेकर
चार खोल्यांमध्ये खूप पुस्तके लिहिली जातात; पण ते चिरकाल टिकणारे नाहीत. पण राष्ट्रसंतांनी प्रत्यक्ष खेडोपाडी जात ग्रामगीता लिहिली. तो आधुनिक काळाचा ग्रंथ झाला आहे. त्या विचारांच्या आधारे आजदेखील गावांचा विकास शक्य आहे. खºया शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांच्या बाहेर न्या, असे मत कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. आजची पिढी स्वकेंद्रित, भौतिक सुखाकडे जाणारी झाली आहे. त्यामुळे माणूस माणसांना जोडण्याची गरज डॉ. चांदेकर यांनी व्यक्त केली.


राष्ट्रसंतांच्या साहित्याची आवश्यकता- रणजित पाटील 
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही राष्ट्रसंतांच्या साहित्याची आवश्यकता विशद केली. ते म्हणाले की, तंत्रज्ञान बदलले; परंतु संत साहित्य मात्र निरंतर आहे. आचरणातून राष्ट्रसंतांनी राष्ट्रकार्याची शिकवण दिली. आधुनिक युगात आम्ही विसरत चाललेली माणुसकी पुन्हा आचरणात येणे आवश्यक असल्याचे सांगत सज्जनांनी एकत्र येण्याची गरज वर्तवली. त्याच बरोबर ही संस्कृती पुढे नेण्यासाठी शासन म्हणून हवी ती मदत करणार असल्याचे घोषित केले.
यावेळी मार्गदर्शन करताना गुरुकुंज मोझरीचे सरचिटणीस बोथे यांनी राष्ट्रसंतांच्या सोबत चीनच्या सीमेवरील युद्ध प्रसंग विशद केला. त्यावेळी त्यांनी राष्ट्र जगेल तर देव, धर्म जगेल, असे सांगत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रीयत्वाची जाणीव करून दिली. कार्र्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम बुटे यांनी अशा प्रकारच्या संमेलनातून संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे मत नोंदविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सोनोपंत दांडेकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीचा योग जुळून आल्याचे ते म्हणाले. डॉ. सुभाष लोहे म्हणाले, भारतीय विचार मंच वैचारिक व्यासपीठ असून, समाजाचे प्रबोधन व्हावे हा उद्देश आहे. तर, बोथे गुरुजी यांनी, राष्ट्रसंतांच्या साहित्याने जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केल्याचे सांगून त्यांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला. 
कार्यक्रमाची सुरुवात भानुदास कराळे व गोवर्धन खवले यांनी गायलेल्या संकल्प गीताने झाली. संकल्प गीत गोवर्धन खवले, भानुदास कराळे यांनी सादर केले. तर, डॉ. शांताराम बुटे, प्रा. किशोर बुटोले, भारतीय विचार मंचचे प्रांत संयोजक डॉ. सुभाष लोहे, यशवंत देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. किशोर बुटोले यांनी केले. 
 सूत्रसंचालन डॉ. राजीव बोरकर यांनी केले. साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. सुभाष लोहे, प्रा. किशोर बुटोले, समीर थोडगे, महेश मोडक यांच्यासोबत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मोझरी, कर्मयोग शिक्षण प्रसारक मंडळ, कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी व भारतीय विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. या साहित्य संमेलनात दोन परिसंवाद व सायंकाळी समारोपीय कार्यक्रमाने सांगता झाली. 

 

Web Title: Prabodhana requires a pair of stylus - Dnyaneshwar Maharaj Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.