ठळक मुद्देरोकड हवाल्यातील असल्याचा संशयपाठलाग करून व्यापार्‍यास घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ऑटोरिक्षातून ४३ लाखांची रोकड घेऊन रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या व्यापार्‍यास सिव्हिल लाइन पोलिसांनी पाठलाग करून रस्त्यात मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडील रोकड जप्त केली असून, जप्त केलेल्या नोटांमध्ये ५00 व २000 रूपयांच्या नवीन नोटा आहेत. ही रक्कम हवालातील असल्याचा पोलिसांनी संशय आहे. 
रणपिसे नगरात राहणारा व्यापारी संतोष कन्हैयालाल राठी (४२) हा मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एमएच ३0 पी ९७0३ क्रमांकाच्या ऑटोरिक्षामध्ये ४३ लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन रेल्वे स्टेशनकडे जात होता. विदर्भ एक्स्प्रेस रेल्वेगाडी पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी व त्यांच्या पोलीस चमूने ऑटोरिक्षा पाठलाग करून रस्त्यातच ऑटोरिक्षा थांबविला आणि व्यापारी संतोष राठी याच्या बॅगेची झडती घेतली. बॅगेमध्ये ४३ लाख रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांना दिसून आल्यावर पोलिसांनी त्याला सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर व्यापारी संतोष राठी याने ही प्लॉट खरेदीसाठी शेगाव येथे नेत असल्याचे सांगितले; परंतु पोलिसांना ही रोकड हवालातील असल्याचा संशय आहे. पोलिसांनी मशीनद्वारे नोटा मोजल्यानंतर ही रक्कम ४३ लाख रुपये भरली. पोलिसांनी ऑटोचालकाला ताब्यात घेतले आहे. 
याप्रकरणी ठाणेदार अन्वर शेख यांनी भादंवि कलम ४१ ड नुसार आयकर विभागाला माहिती दिली. त्यामुळे व्यापारी संतोष राठी याने एवढी मोठी रक्कम कुठून आणली आणि तो ही रक्कम कुठे नेणार होता, याची चौकशी आयकर विभाग करणार आहे. राठी हा कुकर, मिक्सर विक्रीसोबतच ग्रेन र्मचंटचा व्यवसाय करतो. ही कारवाई पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात हरिश्‍चंद्र दाते, शिवा बावस्कर, उकार्डा जाधव, सचिन दांदळे, गजानन बांगर यांनी केली. 

रोकडसोबतच बॅगेत खेळणी, पेढय़ांचे डबे
पोलिसांनी संतोष राठीकडून बॅग जप्त केल्यानंतर त्यात रोकडसोबतच लहान मुलांचे खेळणी, पेढय़ांचे डबे, कपडे आणि जेवणाचा डबा मिळून आला. राठी याची चौकशी केल्यावर त्याने ही रक्कम शेगाव येथे प्लॉट खरेदीसाठी नेत असल्याची पोलिसांसमक्ष माहिती दिली; परंतु बुधवारी त्याच्या चौकशीतून त्याने ही रोकड कोठून आणली आणि कशासाठी तो ही रक्कम नेत होता, याचा उलगडा होईल.