‘बॉटलनेक’च्या विरोधात नागरिकांनी थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 02:47 AM2017-07-25T02:47:04+5:302017-07-25T02:47:04+5:30

रस्त्याचे काम बंद; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना दिले निवेदन

Penalties for citizens against 'BottleNak' | ‘बॉटलनेक’च्या विरोधात नागरिकांनी थोपटले दंड

‘बॉटलनेक’च्या विरोधात नागरिकांनी थोपटले दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात अरुंद रस्ता निर्माण करून ‘बॉटल नेक’ कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी दंड थोपटले. महापालिका प्रशासनाने गोरक्षण रोडवर अतिक्रमण करुन बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात करण्याची मागणी करीत नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले. याविषयी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी पाठपुरावा केल्यानंतर शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. या निधीतून नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकापर्यंत एकूण २ हजार ६३१ मीटर अंतर व १५ मीटर रुंद रस्ता तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात आहे.
नेहरू पार्क चौक ते गोरक्षण संस्थानपर्यंत १ हजार ३२० मीटर अंतराच्या रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली; मात्र पहिल्याच टप्प्यात महापारेषण कार्यालय ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत ५०० मीटर अंतराच्या इन्कम टॅक्स चौकातील इमारतींमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला आहे. परिसरातील अतिक्रमित इमारतींमुळे ५०० मीटर अंतरापर्यंत ‘बॉटल नेक’(निमुळता भाग) तयार होईल. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार गोरक्षण रस्त्याची रुंदी २४ मीटर असताना तसेच ‘पीडब्ल्यूडी’च्या लेखी हा रस्ता कागदोपत्री १५ मीटर रुंद असल्यावरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते महालक्ष्मी हार्डवेअरपर्यंत केवळ ११ मीटर रुंद रस्त्याचे निर्माण केले जात असल्याचा मुद्दा लोकमत सातत्याने लावून धरला आहे. शनिवारच्या अंकातही या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले, याची दखल घेत विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी इन्कम टॅक्स चौकात ११ मीटर रुंद रस्ता तयार केल्यास भविष्यात ‘बॉटलनेक’ कायम राहणार असल्यामुळे सदर काम बंद करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले.
संबंधित कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे बजावत नागरिकांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी विनायकराव पवार, गोपी ठाकरे, मनोहरराव हरणे, अनिल माहोरे, अजय गावंडे, पंकज जायले, राधेश्याम शर्मा, बाळू देशमुख, राजेंद्र पातोडे, सचिन शिराळे, अक्षय झटाले, नितेश कर्तक, प्रेमकुमार वानखडे, योगेश थोरात,अमोल शिरसाट आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
‘बॉटल नेक’च्या मुद्यावर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची भेट घेतली. रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या इमारती हटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही अवधी लागेल. यामुळे भविष्यातील अरुंद रस्त्याची समस्या निकाली निघणार असण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

काम बंद करण्याचे निर्देश
इन्कम टॅक्स चौकातील बॉटलनेक दूर केल्यानंतर रस्ता रुंदीकरणाला सुरुवात क रावी तोपर्यंत रस्त्याचे काम बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना दिले आहेत.

इमारती हटविण्याचा मार्ग मोकळा
मनपाच्या विकास आराखड्यानुसार गोरक्षण रोड २४ मीटर रुंद आहे. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते महालक्ष्मी हार्डवेअरपर्यंत अरुंद रस्ता आहे. यासंदर्भात नगररचना संचालक, पुणे यांचा अहवाल प्राप्त झाला असून, इमारती हटविण्यास कोणतीही आडकाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Penalties for citizens against 'BottleNak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.