रात्री तीन वाजता केला दुकानावर अवैधरीत्या कब्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:30 AM2017-11-18T02:30:05+5:302017-11-18T02:34:54+5:30

संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले होते. त्यांची बदली झाल्यानंतर आता हळूहळू संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली असल्याचे प्रत्यंतर बुधवारी रात्री आले आहे.  

Occupied illegally at the shop at three o'clock in the night! | रात्री तीन वाजता केला दुकानावर अवैधरीत्या कब्जा!

रात्री तीन वाजता केला दुकानावर अवैधरीत्या कब्जा!

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रार देऊनही कारवाई नाही अकोल्यात संघटित गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले होते. त्यांची बदली झाल्यानंतर आता हळूहळू संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली असल्याचे प्रत्यंतर बुधवारी रात्री आले आहे.  सदैव गजबजलेल्या  मोहंमद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन दुकानाचे कुलूप तोडून अनधिकृतरीत्या दुकानाचा ताबा घेतला. हा प्रकार हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि अतिसंवेदनशील भागातील ताजनापेठ पोलीस चौकीजवळ घडल्यावरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एवढेच नाही, तर गुंडांनी रात्री ३ वाजताच्या सुमारास विद्युत डीपीवरून मोहंमद अली रोड परिसराचा विद्युत पुरवठा खंडित केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 दीपक चौकात राहणारे अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहंमद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. त्यांनी अब्दुल हबीब यांच्या वडिलांना व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी मुखत्यार म्हणून नेमले होते. 
वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अब्दुल हबीब हे दुकानाचे काम सांभाळतात. या दुकानाबाबत अब्दुल हबीब यांचे व मूळ भाडेकरी व दुकान मालकाचा आपसात दिवाणी न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खटला सुरू आहे. दुकानाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, मालकाने हे दुकान काही लोकांना विकले. मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्‍या व्यक्तीने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडले आणि अनधिकृतपणे  दुकानाचा ताबा घेतला व दुकानातील साहित्य बाहेर फेकून दिले आणि हातात शस्त्र घेऊन हे गुंड त्यांची दुकानात येण्याची वाट पाहत होते, असा आरोप त्यांनी केला. मोहंमद अली रोड हा अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. अब्दुल हबीब यांच्या दुकानापासून अगदी हाकेच्या अंतरावर ताजनापेठ पोलीस चौकी आहे. 
संघटित गुंडांनी बुधवारी रात्री हातात शस्त्र घेऊन दुकानाचे कुलूप तोडले. अतिसंवेदनशील भागात गुंड हैदोस घालीत असताना पोलिसांच्या कानावर हा प्रकार कसा गेला नाही, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या घटनेवरून खुलेआम गुंडगिरी करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली असल्याचे दिसून येते. पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील गुंडगिरी फोफावल्याचे हे उदाहरण आहे. 

विद्युत पुरवठाही केला खंडित
संघटित गुन्हेगारी आणि हातात शस्त्र घेऊन घातलेला हैदोस परिसरातील सीसी कॅमेर्‍यांमध्ये टिपल्या जाऊ नये, या उद्देशाने गुंडांनी रात्री ३ वाजता डीपीवरून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे परिसरात सर्वत्र अंधार पसरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गैरअर्जदाराच्या बाजूने मार्च महिन्यात न्यायालयाने निर्णय देत, दुकानाचा ताबा देण्याचे आदेश दिले. त्याने आमच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रतही सादर केली. झालेल्या बैठकीत अर्जदाराने गैरअर्जदाराला दुकानाचा ताबाही दिला. शस्त्र घेऊन कोणीही आले नाही, आम्ही चौकशी केली आहे. 
- अनिल जुमळे, ठाणेदार, कोतवाली पोलीस स्टेशन.

गैरअर्जदाराला दुकानाचा ताबा दिलेला नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातात शस्त्रे घेऊन आलेल्या गुंडांनी दुकानाचे कुलूप तोडून ताबा घेतला. याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात केली; परंतु पोलिसांनी गुंडांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.  
- अब्दुल हबीब, तक्रारकर्ता

Web Title: Occupied illegally at the shop at three o'clock in the night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा