आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:31 PM2019-05-16T12:31:19+5:302019-05-16T12:34:47+5:30

वाढलेला हा मृत्यूदर कमी करून कॅन्सरचे वेळेतच निदान व्हावे या अनुषंगाने गाव पातळीवरच कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे.

Now 'screening' of cancer in primary health center | आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग'

आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग'

Next
ठळक मुद्देराज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी सेंटर सुरू करण्यात येणार. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.इतर नॉन कम्युनिकेबल आजारांचेही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

- प्रवीण खेते
अकोला: कॅन्सरमुळे दरवर्षी २५ टक्के लोकांचा मृत्यू होत असून, कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजाराच्या अज्ञानामुळे वाढलेला हा मृत्यूदर कमी करून कॅन्सरचे वेळेतच निदान व्हावे या अनुषंगाने गाव पातळीवरच कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी सेंटर सुरू करण्यात येणार असून, आरोग्य विभाग तयारीला लागले आहे.
कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या चार विकारांमुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामधील २५ टक्के रुग्ण कॅन्सरचे असतात. कॅन्सर झाल्याचे लवकर लक्षात न आल्याने किंवा अज्ञानामुळे त्याच्यावर उशिरा उपचार सुरू होत असल्याने या आजारामुळे मृत्यूदर वाढला आहे. विशेष करून महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, गर्भाशय आणि स्तन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. कॅन्सरमुळे वाढलेला मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावा या अनुषंगाने राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. सन २०२० पासून राज्यभरातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एनसीडी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने राज्यभरात प्रशिक्षक निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत असून, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या आजारांचेही होईल स्क्रिनिंग
कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब, डोळ््यांचे आजार, हृदयविकार यासह इतर नॉन कम्युनिकेबल आजारांचेही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

प्राथमिक स्तरावर उपक्रमास प्रारंभ
अकोल्यासह राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये या उपक्रमास प्राथमिक स्तरावर सुरुवात झाली आहे. विविध उपक्रमांतर्गत रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत असून, या आजाराची लक्षणे आढळल्यास संबंधितांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आली.

कोण करू शकते तपासणी?
या उपक्रमांतर्गत प्रत्येक व्यक्ती आरोग्याची नि:शुल्क तपासणी करू शकते. त्यामुळे कुठल्याही आजाराविषयी मनात शंका असल्यास प्रत्येकाने पीएचसीमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

विभागीय स्तरावर प्रशिक्षकांची निर्मिती करण्यात आली असून, जिल्हा स्तरावरदेखील प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. यांच्यामार्फत राज्यभरातील पीएचसी केंद्रावर विविध आजारांची प्राथमिक तपासणी करून आजारांचे निदान करण्यात येणार आहे. अकोल्यात या उपक्रमास सुरुवात झाली आहे.
- डॉ. विजय जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

 

Web Title: Now 'screening' of cancer in primary health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.