वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास !

By atul.jaiswal | Published: November 18, 2017 02:23 PM2017-11-18T14:23:35+5:302017-11-18T14:36:15+5:30

अकोला : धुळीचे शहर अशी ओळख होत असलेल्या अकोल्यातील धुळीचे प्रमाण निश्चित मानकापेक्षा ५० टक्के जास्त असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. यासोबतच शहरातील वाहनांची संख्याही वाढत असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषित झाली आहे.

More than 50 percent of the dust in the atmosphere: suffocation in Akola city | वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास !

वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास !

Next
ठळक मुद्देवाहनांच्या धुराचीही भरदम्याचा आजार बळावला

- अतुल जयस्वाल

 अकोला : धुळीचे शहर अशी ओळख होत असलेल्या अकोल्यातील धुळीचे प्रमाण निश्चित मानकापेक्षा ५० टक्के जास्त असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. यासोबतच शहरातील वाहनांची संख्याही वाढत असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. धूर आणि धुळीच्या मिश्रणामुळे अकोल्याचा श्वास गुदमरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दमा व श्वसनासंबंधीचे विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर सांगत असले, तरी प्रशासनाकडून या प्रकाराची फारशी गंभीर दखल घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे.
हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यातील १७ शहरांमध्ये अकोल्याचा समावेश आहे. वाढती धूळ, जाळलेला कचरा, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे दमा, श्वसन विकार आणि फुप्फुस विकारांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे आजार वाढत आहेत. वातावरणातील धूळ व धुराचा लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असून, त्यांना श्वसनाचे विकार जडत आहेत.

धूर, धूळ व जड हवेच्या मिश्रणाची शहरावर चादर
अकोला शहरात मुख्य रस्ते सिमेंटचे झाले असले, तरी या रस्त्यांवरही धूळ उडताना दिसते. बहुतांश मुख्य रस्त्यांवरून वाहने गेल्यानंतर धूळ उडते. रस्त्यांवरील ही धूळ हवेत मिसळून नाकांवाटे नागरिकांच्या श्वसनसंस्थेत प्रवेश करते. सायंकाळच्या वेळी रस्त्यावरील धूळ, वाहनांचे धूर व जड झालेली हवा यांच्या मिश्रणाची दाट चादर शहराला कवेत घेते.


ब्लॅक कार्बन, धुळीचे कण ठरताहेत घातक
शहरांमधील वातावरणातील प्रदूषणाला कारणीभूत सल्फेट नायट्रेटस, कार्बन मोनोआॅक्साइड, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व २.५ मायक्रॉनचे पार्टिकल कण श्वसननलिकेमध्ये श्वासाद्वारे शरीरात शिरतात. त्यामुळे श्वसननलिका लालसर होते, आकुंचन पावते. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे.


२० टक्के शाळकरी मुलांना अस्थमा
वाढते प्रदूषण, मानसिक ताण व धकाधकीच्या जीवनामुळे दिवसेंदिवस अस्थमाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये शाळकरी मुलांचे प्रमाण लक्षणीय असून, सुमारे २० टक्के मुलांना अस्थमाने आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला शहरातही हे प्रमाण मोठे आहे. अस्थमा असलेल्या अनेक रुग्णांना त्यांना हा आजार झाल्याची कल्पनाही नसते. अस्थमाचे शाळकरी मुलांमधील वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

श्वसन विकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक
श्वसन विकारामध्ये भारताचा क्रमांक सातवा होता. आता भारत तिसºया क्रमांकावर आला असून, श्वसन विकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. भारतात दरवर्षी १२ ते २० लाख रुग्ण श्वसन, फुप्फुस आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून येतात. श्वसन विकारामध्ये खोकला, कफ पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घरघर करणे, फुप्फुस कमकुवत होणे आदी त्रास जाणवतात.

वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण व धूळ ही मानवी आरोग्यासाठी घातक असल्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना मास्क किंवा नाकाला रुमाल बांधण्याची खबरदारी बाळगावी, तसेच आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर केल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल.

- डॉ. अभिजित अडगावकर, सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

Web Title: More than 50 percent of the dust in the atmosphere: suffocation in Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.